Call for enlistment of industrial establishments for skilled manpower
कुशल मनुष्यबळाकरीता औद्योगिक आस्थापनांना सूचीबद्ध होण्याचे आवाहन
पुणे : प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून यामाध्यमातून कुशल मनुष्यबळाकरीता औद्योगिक आस्थापनांनी सूचीबद्ध होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.
जागतिक स्तरावर वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानानुसार कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेत औद्योगिक क्षेत्रातील आस्थापनांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविताना औद्योगिक आस्थापनांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. औद्योगिक आस्थापनांना त्यांच्या मागणीनुसार आवश्यक कुशल मनुष्यबळाची विहीत कालावधीत उपलब्ध करुन देता येईल, तसेच आस्थापनामध्ये कुशल मनुष्यबळ तयार करता येईल. या माध्यमातून इच्छूक उमेदवारांना आवश्यक कौशल्य प्राप्त होऊन रोजगार व औद्योगिक आस्थापनांना योग्य कुशल मनुष्यबळ प्राप्त होऊन औद्योगिक विकास साधता येणार आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याच्या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील विविध औद्योगिक आस्थापनांनी सहभागी व्हावे, कौशल्य विकासाच्या कामकाजात भरीव योगदान द्यावे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे या कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन प्रभारी सहायक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com