Award distribution to winners of National Start Up Awards 2022
राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार 2022 च्या विजेत्यांना पुरस्कार वितरण
महाराष्ट्रातले ९ स्टार्ट अप उद्योग पुरस्कारानं सन्मानित
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्टार्ट अप दिनाच्या प्रसंगी आज राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार 2022 च्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान करून स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष सप्ताहा’चा समारोप झाला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातल्या एकूण ९ स्टार्ट अप उद्योगांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक शहरांमधल्या स्टार्टअप्सचा यात समावेश आहे. त्यात शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रातले २, पर्यावरण क्षेत्रातले २, आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातला १, माध्यमं आणि गुंतवणूक क्षेत्रातले २, तर संरक्षण आणि वाहतूक या क्षेत्रातल्या प्रत्येकी एका स्टार्ट अपचा समावेश आहे.
भारताच्या विकासाच्या परिवर्तनकारी यशोगाथेमध्ये एक अध्याय रचणाऱ्या, केवळ आर्थिक लाभाच्या बाबतीतच नव्हे तर समाजावर दृश्य स्वरूपात केलेल्या प्रभावी परिणामांबद्दल आणि उल्लेखनीय क्षमता सिद्ध करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या स्टार्टअप्स आणि सक्षमकर्त्यांना राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले.
सरकार व्यवस्था आणि प्रक्रियांची सक्षमता आणि एकात्मता सुधारण्यासाठी सतत नव्या आणि उत्तम संकल्पनांवर लक्ष केंद्रित करत आहे, असं गोयल यांनी यावेळी सांगितलं.
बेंगळुरू, रायसेन, गुरुग्राम, इंदूर, भोपाळ, गांधीनगर, गाझियाबाद, मोहाली, दिल्ली, भुवनेश्वर, जळगाव, नागपूर, कोट्टायम, इम्फाळ, कोलकाता आणि इतर अनेक शहरांमध्ये ऑफलाइन आणि ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विविध केंद्रे स्टार्टअप इंडियामध्ये सहभागी झाली. क्षमता बांधणी कार्यशाळा, तज्ज्ञांचा परिसंवाद, राज्य स्तरीय स्पर्धा आणि आव्हाने, स्टार्ट अप प्रदर्शनं , स्टार्ट अप संमेलने, गोलमेज परिषदा इत्यादी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com