The infrastructure projects inaugurated in Mumbai will make the life of citizens more bearable
मुंबईत उद्घाटन झालेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळं नागरिकांचं जीवन सुसह्य होईल
– प्रधानमंत्री
येत्या ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा राज्य सरकारचा निर्धार – मुख्यमंत्री
मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन झालं.
वांद्रे – कुर्ला संकुलातल्या एमएमआरडीए मैदानावर मेट्रो मार्गिका २- अ आणि ७ च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांनी केलं. बृहन्मुंबई महापालिकेच्या २० ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चं लोकार्पण, सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महापालिकेच्या गोरेगाव, भांडुप आणि ओशिवरा या तीन रुग्णालयांच्या पुनर्विकास कामांचं भूमीपूजन, मुंबईतल्या सुमारे ४०० किलोमीटर रस्त्यांचं काँक्रीटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांचं भूमीपूजन प्रधानमंत्र्यांनी केलं.
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त फेरीवाल्यांना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज झाला.
त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी मेट्रोच्या नव्या मार्गिकेवर प्रवास केला. या दरम्यान त्यांनी सामान्य नागरिक, विद्यार्थी यांच्यासह मेट्रोवर काम केलेल्या मजुरांशी संवाद साधला. गुंदवली मेट्रो स्थानकावर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड – मुंबई १ चं लोकार्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. या एकाच कार्डवरुन मेट्रो, रेल्वे आणि बेस्टच्या बस चं तिकीट काढणं भविष्यात शक्य होणार आहे. या सर्व कार्यक्रमानंतर प्रधानमंत्री नवी दिल्लीला रवाना झाले.
मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाचं भूमीपूजन आणि लोकार्पण झाल्यानं मुंबईचा कायापालट होऊन नागरिकाचं जीवन सुसह्य होईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत व्यक्त केला. वांद्रे-कुर्ला संकुलात विविध विकासकामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण केल्यानंतर आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
भाषणाच्या सुरुवातीला प्रधानमंत्र्यांनी उपस्थितांना मराठीत अभिवादन केलं. स्वातंत्र्यानंतर भारत पहिल्यांदा मोठी स्वप्न पाहणं आणि ती पूर्ण करण्याचं साहस करतो आहे. विकसित भारताच्या निर्माणाची जितकी उत्सुकता भारताला आहे, तितकाच आशावाद जगाला आहे, असं ते म्हणाले.
देशात सध्याची गरज आणि भविष्याची आव्हानं लक्षात घेऊन विकासकामं केली जात आहेत, असं त्यांनी सांगितलं. सध्या देशातल्या शहरांच्या संपूर्ण कायापालटावर काम सुरू आहे. जगातले अनेक देश कठीण परिस्थितीत असताना भारत ८० कोटींहून अधिक लोकांना मोफत अन्नधान्य देतो आहे. याशिवाय पायाभूत सुविधा विकसित करतो आहे, असं ते म्हणाले. पण शहरांचा विकास करताना स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विचारांवर स्थानिक स्वराज्य संस्था काम करत असेल तर विकास वेगानं होतो असं ते म्हणाले. सध्या मुंबईच्या विकासासाठी निधीची कमतरता नाही, मात्र निधी योग्य ठिकाणी खर्च होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
नवी मुंबई विमानतळ, ट्रान्स हार्बर लिंक, धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास यासारख्या विकास कामांमुळं मुंबई आणि परिसराचा झपाट्यानं विकास होत असून नागरिकांचं जगणं सुसह्य होत असल्याचं त्यांनी सांगितलं. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने स्वराज आणि सुराजची भावना डबल इंजिन सरकारमध्ये प्रबळ रुपानं समोर येते आहे, असं ते म्हणाले.
भाजपा किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं कधीही विकासात राजकारण आणलं नाही, असं त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रोची उभारणी धीम्या गतीनं होत होती. पण सध्याच्या डबल इंजिन सरकारच्या काळात मुंबई मेट्रोची उभारणी जोरानं सुरू झाली, असं ते म्हणाले. त्यांनी यावेळी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची वैशिष्ट्ये आणि गरज समजावून सांगितली.
येत्या ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा राज्य सरकारचा निर्धार – मुख्यमंत्री
मुंबईतलं मेट्रोचं जाळं पूर्ण होईल तेव्हा ३०-४० लाख नागरिकांना त्याचा लाभ होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज २० हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचं उद्घाटन झालं. आणखी १२३ दवाखाने मार्चपर्यंत सुरू होतील, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं. लवकरच होणाऱ्या पालिका निवडणुकीत आम्ही विजयी होऊ आणि ट्रिपल इंजिन सरकार कार्यरत होईल, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधकांच्या टीकेला आम्ही कामानं उत्तर देऊ असं ते म्हणाले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ फेरीवाल्यांना मिळू नये, असा आदेश महाविकास आघाडी सरकारनं दिला होता असा आरोप त्यांनी केला. पण सध्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नामुळं आज सुमारे १ लाख १५ हजार फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ मिळणार असल्याचं ते म्हणाले. आम्ही सत्तेत आल्यावर मुंबईतल्या रस्त्यांचं क्राँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. आता या रस्त्यावर ४० वर्ष खड्डे पडणार नाही, असा दावा त्यांनी केला. लवकरच धारावीच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यासाठी प्रधानमंत्र्यांना बोलवू, असं ते म्हणाले.
सभास्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटा घालून आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भागवत कराड, कपिल पाटील, रामदास आठवले यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातले मंत्री आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com