One gets the feeling of happiness through plays
नाटकांच्या माध्यमातून मिळते आनंदाची अनुभूती
– सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
सध्याचे युग हे धनाचे नसून आनंदी मनाचे आहे
शिवाजी नाट्य मंदिर येथे ‘शूरा मी वंदिले’ संगीतमय कार्यक्रम
मुंबई : सध्याचे युग हे धनाचे नसून आनंदी मनाचे आहे. संयुक्त राष्ट्र ही आता राष्ट्र किती धनवान आहे, हे बघत नसून किती आनंदी आहे हे बघते. त्यामुळे राष्ट्रांचा ‘हॅपिनेस इंडेक्स ‘ तयार करण्यात आला आहे. नाटक बघून मानव आपले दुःख विसरतो व त्याला आनंदाची अनुभूती मिळते, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या १५० व्या जयंतीवर्षा निमित्त त्यांच्या संगीत नाटकांवर आधारित ‘शूरा मी वंदिले’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन आज दादर येथील शिवाजी नाट्य मंदिर येथे करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी विशेष उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, तेव्हा ते बोलत होते. प्रारंभी नाट्याचार्य कृ. प्र खाडिलकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
श्री मुनगंटीवार पुढे म्हणाले की, या कार्यक्रमामुळे नाट्याचार्य कृ.प्र. खाडिलकर यांचा जीवनपट समोर आला. सांस्कृतिक कार्य विभाग ऊर्जा असलेला विभाग आहे. सांस्कृतिक कार्य विभागाला अधिक बळकट करण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रतिभावंतांनी आपल्या सूचना द्याव्यात, असे आवाहनही मंत्री श्री मुनगंटीवार यांनी केले.
या कार्यक्रमाच्या वेळी शिवाजी नाट्य मंदिरात अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, अभिनेता शैलेश दातार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसंचालक श्रीराम पांडे, स्वरकुल संस्थेच्या वीणा खाडिलकर आणि त्यागराज खाडिलकर आदी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसंचालक श्री. पांडे यांनी प्रास्ताविक केले. स्वातंत्र्य सैनिक, लेखक, पत्रकार, नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांचे समग्र लेखन आणि जीवनावर आधारीत “शूरा मी वंदिले” हा कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यागराज खाडिलकर यांनी सूत्रसंचालन केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com