Call for submission of applications for scholarships
शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
- भारत सरकार शिष्यवृत्ती
- शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती
- राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनेचे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील अर्ज विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरुन भरावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले शिष्यवृत्तीचे अर्ज https://mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन भरून ऑफलाईन पद्धतीने आपल्या महाविद्यालयात जमा करणे आवश्यक आहे.
सन २०२२-२३ या वर्षात १०० टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली नसल्याने सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत १०० टक्के नोंदणी होईल याची दक्षता घ्यावी. तसेच महाविद्यालयाकडील प्रलंबित अर्जही २ दिवसात सहायक आयुक्त कार्यालयाकडे सादर करावेत.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी प्रवेशित एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास आणि त्यामुळे एखादा पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यास सामाजिक न्याय विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग जबाबदार राहणार नाहीत, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी कळविले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com