Hardeep Singh Puri inaugurates demonstration cruise of MD 15 fuel powered boat
एमडी १५ या इंधनावर चालणाऱ्या नौकेच्या प्रात्यक्षिक सफरीचे हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते उद्घाटन
महाबाहू ब्रम्हपूत्रेवरील कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या क्रुझला केन्द्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी केले रवाना
गुवाहाटी : पेट्रोलियन आणि नैसर्गिक वायू आणि गृह आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी काल मिथेनॉलमिश्रित डिझेलवर म्हणजे एमडी १५ या इंधनावर चालणाऱ्या नौकेच्या प्रात्यक्षिक सफरीचं उद्घाटन केलं.
गुवाहाटीत झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेलीही उपस्थित होते. बेंगळुरूमध्ये ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या भारत ऊर्जा सप्ताहात होणाऱ्या सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर ही चाचणी घेण्यात आली.
या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना पुरी म्हणाले, की नामरूपमधील आसाम पेट्रोकेमिकल लिमिटेड ही कंपनी सध्या दिवसाला १०० टन मिथेनॉलचं उत्पादन करते. हे उत्पादन प्रतिदिन ५०० टनांवर नेण्याच्या नवीन प्रकल्पाचीही अंमलबजावणी सुरू आहे.
“आसाममध्ये, आसाम पेट्रोकेमिकल लिमिटेड (एपीएल), नामरूप सध्या सुमारे 100 टीपीडी मिथेनॉलचे उत्पादन करत असून मिथेनॉलच्या 500 टीपीडी उत्पादनासाठी एक नवीन प्रकल्प राबवत आहे.” असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
स्वदेशी तंत्रज्ञान वापरून कोळशाचं मिथेनॉनलमध्ये रूपांतर करण्यासाठीच्या प्रकल्पांची देशात उभारणी करण्याबाबतचं कामही सध्या सुरू आहे. भेलचे हैदराबाद आणि तिरुचिरापल्ली इथले प्रकल्प, थरमॅक्स आणि आयआयटी दिल्ली हे तंत्रज्ञान विकसित करत आहेत. काल चाचणी घेण्यात आलेली नौका पन्नास आसनांची असून तिचं नाव एसबी गंगाधर असं ठेवण्यात आलं आहे.
भारताच्या तेल आयातीचा खर्च, हरितगृह वायू (जीएचजी) उत्सर्जन कमी करणे आणि कोळशाचे साठे तसेच नगरपालिकेतील घनकचऱ्याचे मिथेनॉलमध्ये रूपांतर करणे हे नीती आयोगाच्या ‘मिथेनॉल अर्थव्यवस्था’ कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.
जलवाहतुकीच्या दृष्टीने मिथेनॉल हे किफायतशीर पर्यायी इंधन आहे. हे इतर इंधनापेक्षा कमी खर्चिक आहे. किनाऱ्यावरील साठवणूक आणि संबंधित पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या दृष्टीने किफायतशीर आहे. मिथेनॉलवर चालण्यासाठी जहाजात बदल करण्यासाठी लागणारा खर्च इतर पर्यायी इंधन रूपांतरणांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे. बदलानंतर महागड्या एक्झॉस्ट वायूचीही आवश्यकता नाही आणि द्रव इंधन म्हणून, मिथेनॉल हाताळण्यासाठी विद्यमान साठवणूक आणि संबंधित पायाभूत सुविधांसाठी फक्त किरकोळ बदल आवश्यक आहेत.
इंधनात 15% मिथेनॉल मिसळल्याने इंधन/कच्च्या तेलाच्या आयातीत किमान 15% कपात होऊ शकते. या व्यतिरिक्त, यामुळे, एनओएक्स आणि एसओएक्सच्या बाबतीत जीएचजी उत्सर्जन 20% कमी होईल, ज्यामुळे शहरी हवेची गुणवत्ता सुधारेल.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com