Organization of Invitational State-Level Mallakhamb Competition
निमंत्रित राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन
शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्यावतीने नामदार चंद्रकांतदादा पाटील चषक 2023-निमंत्रित राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन
खेलेगा इंडिया.. तभी तो खिलेगा इंडिया
पुणे: शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी ही भारतीय खेळ, कला आणि सांस्कृतिक वारसा जोपासणारी सामाजिक संस्था आहे. संस्था खेळाबरोबरच शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रातही आपले काम करत आहे. मुलांमध्ये भारतीय खेळ आणि व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून संस्था विशेष प्रयत्न करते.
भारतीय खेळ नवोदित खेळाडूंमध्ये रुजावा आणि जास्तीत जास्त खेळाडूंपर्यंत पोचावा यासाठी शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीने नामदार चंद्रकांतदादा पाटील चषक 2023-निमंत्रित राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र राज्य हौशी मल्लखांब संघटनेची मान्यता असलेली ही स्पर्धा पटवर्धन बाग येथील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानासमोरील मैदानावर दि. 28 आणि 29 जानेवारी रोजी होणार आहेत. या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे सहकार्य लाभणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातील संस्थांनी सहभाग नोंदवला असून 700 ते 750 खेळाडू आपल्या खेळाची चुणूक दाखवणार आहेत.
खेळाडूंसाठी अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असे पोडियम उभारण्यात आले आहे. तसेच खेळाडूंसाठी रहाण्याची व्यवस्था परिसरातील हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. येणाऱ्या प्रत्येक खेळाडूस वेलकम किट देण्यात येणार आहे. यामध्ये खेळाडूला आवश्यक असणारी बॅग, टी शर्ट, नॅपकिन, पाण्याची बाटली इ. गोष्टी आहेत.
एकूण तीन वयोगटामध्ये ही स्पर्धा होणार आहे. एकूण पाच लाख रुपयांची रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
सदर स्पर्धा 14 वर्षाखालील मुले-मुली, 16 वर्षाखालील आणि 16 वर्षांवरील मुली, 18 वर्षांखालील आणि 18 वर्षांवरील मुले या वयोगटामध्ये होणार आहेत. यामध्ये खेळाडू दोरीचा आणि पुरलेला मल्लखांब या साधनांवर आपली स्पर्धा खेळतील.
तसेच मल्लखांब या खेळाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी वरीष्ठ गटासाठी विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष प्रकारामध्ये वय वर्षे 30 पासून ते 80 वर्षांच्या खेळाडू व प्रशिक्षकांनी सहभाग नोंदवला आहे. वरिष्ठ गटामध्ये होणाऱ्या या स्पर्धांमध्ये महिलांसाठी 25 ते 35, 35 ते 45 आणि 45 वर्षांवरील असा वयोगट असेल तर पुरुषांमध्ये 30 ते 40, 40 ते 50 आणि 50 वर्षांवरील असे वयोगट असणार आहेत. यामध्ये महिलांसाठी दोरीचा तर पुरुषांसाठी पुरलेला मल्लखांब अशी साधने असतील. वरिष्ठ वयोगटामध्ये अनेक छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू, नामवंत प्रशिक्षक, पंच आपल्या खेळाची चुणूक दाखवणार आहेत.
या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना पाच लाख रुपयांची रोख पारितोषिक, मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील असणार आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजता मध्यप्रदेशचे मल्लखांब द्रोणाचार्य पुरस्कार विजेते श्री. योगेश मालविय आणि भारतीय मल्लखांब महासंघाचे सचिव श्री धरम वीर सिंग यांच्या शुभहस्ते होणार आहे. या दोन दिवसीय स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करणार आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “निमंत्रित राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन”