74th Republic Day is celebrated with enthusiasm across the country
देशभरात ७४वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
राज्यात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
मुंबईत शिवाजी पार्क इथं झालेल्या मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजवंदन
प्रजासत्ताकदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ध्वजारोहण
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना
नवी दिल्ली : देशभरात आज ७४वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. प्रजासत्ताक दिनाचा देशाचा मुख्य सोहळा आज नवी दिल्लीत कर्तव्य पथ इथं झाला. मुख्य सोहळ्यात ध्वजवंदनेआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर परंपरेनुसार राष्ट्रध्वज २१ तोफांच्या सलामीसह राष्ट्रगीताच्या सुरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फडकवण्यात. यावेळी राष्ट्रपतींनी तीनही सुरक्षा दलांची मानवंदनाही स्विकारली.
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी हे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी झालेल्या संचलनात, पहिल्यांदाच इजिप्तच्या लष्कराच्या तुकडीनं भाग घेतला. या सोहळ्यात महाराष्ट्रासह १७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसह सहा मंत्रालय आणि विभागांचे मिळून २३ चित्ररथ सहभागी झाले होते. स्त्री शक्ती ही यंदाच्या चित्ररथांची आणि संचलनाची मध्यवर्ती संकल्पना होती. देशाची समृद्ध संस्कृती, आर्थिक, सामाजिक आणि संरक्षण क्षेत्रातील प्रगती याची झलक या चित्ररथांद्वारे घडली. महाराष्ट्राच्या चित्ररथावर कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण पीठे आणि वणीची सप्तशृंगी अशा साडेतीन शक्तीपिठांचा देखावा साकारला गेला.
राज्यात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
राज्यात आज चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुंबईत शिवाजी पार्क इथं झालेल्या मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. राज्यपालांना पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली. तसंच त्यांनी संचलनाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. सन २०२६- २७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करण्याच्या देशाच्या उद्देशास सुसंगत असं एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करण्याचं महत्वाकांक्षी लक्ष्य महाराष्ट्रानं ठेवलं आहे, असं राज्यपालांनी सांगितलं.
राज्य मंत्रिमंडळानं ८७,७७४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या आणि ६१,०४० रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या एकूण २४ प्रकल्पांना मान्यता दिली आहे. मराठवाडा आणि विदर्भात ४७,८९० रोजगार निर्मितीसह ४६,५२८ कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव प्राप्त झाले असून ते एकूण प्रस्तावित गुंतवणूक आणि रोजगाराच्या निम्म्याहून अधिक आहे, असं राज्यपालांनी सांगितलं.
नुकताच दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेतही एक लाख ३७ हजार कोटींचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाल्यानं गुंतवणूकदारांचा राज्यावरचा विश्वास प्रकट झाला आहे, असं ते म्हणाले. राज्यात दोनशे कोटी रुपयांच्या तरतुदीसह ‘महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान’ सुरू करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू ठामपणे मांडण्यात येत आहे, असं राज्यपाल म्हणाले. महाराष्ट्रानं मुंबई आणि पुण्यात G20 ची बैठक नुकतीच यशस्वीरित्या आयोजित केली. नागपूर आणि औरंगाबाद इथंही G20 च्या बैठका होणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.
मुंबई ते नागपूर या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या सातशे एक किलोमीटर लांबीपैकी नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पाचशे एकवीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे लोकार्पण; मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे भागातल्या मेट्रो मार्गांची दर्जेदार आणि जलद गतीनं होणारी कामं, युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करुन पंचाहत्तर हजार रिक्त पदांवर भर्ती प्रक्रिया सुरु, स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनामध्ये वाढ, ‘दिव्यांग कल्याण विभाग’ या नवीन स्वतंत्र विभागाची स्थापना या महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन एक नवीन आणि बलशाली महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीननं संकल्प करावा असं आवाहन राज्यपालांनी केलं.
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन केलं. यावेळी महाराष्ट्र पोलीस दलानं राष्ट्रगीत सादर केलं, आणि राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात विविध शासकीय कार्यालयं, शाळा, महाविद्यालयं, गृहसंकुलं, सामाजिक संस्था आणि राज्यभरातल्या विविध जिल्हाधिकारी कार्यालयांमध्येही कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. मुंबईत मंत्रालय, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेचं मुख्यालय आणि महत्त्वाच्या स्मारकांवर रोषणाई केली आहे.
मुंबईत शिवाजी पार्क इथं झालेल्या मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मुंबई आकाशवाणीत प्रसारण भवन इथं उपमहासंचालक रमेश घरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते कोकण विभागीय स्तरावरील ध्वजारोहण कळंबोली इथल्या पोलीस मुख्यालय मैदानावर करण्यात आलं.
प्रजासत्ताकदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ध्वजारोहण
येथील कस्तुरचंद पार्कवर आयोजित भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह राज्य शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. फडणवीस यांनी नागपूर पोलीस, होमगार्ड, छात्रसेना, स्काऊटगाईड आदी १७ पथकांचे खुल्या जिप्सीमधून निरीक्षण केले. परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांच्या नेतृत्वात या सर्व पथकांनी मुख्यमंचासमोरून पथ संचलन केले. श्री. फडणवीस यांनी या सर्व पथकांची मानवंदना स्वीकारली. अश्वदल, श्वानपथक आणि अग्नीशमनदलाचेही पथसंचलन झाले. जिल्हा क्रीडा परिषदेचा चित्ररथ या पथसंचलनात सहभागी झाला. विद्यार्थ्यांनी या चित्ररथावर मल्लखांबासह योगासनांचे प्रात्याक्षिक सादर केली.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पोलीस परेड मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
कार्यक्रमास विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिचंवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त रितेश कुमार, विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा येथील प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात येऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी विजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
विधानभवन येथे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजवंदन
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त विधानभवन प्रांगणात विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड, उपायुक्त वर्षा लढ्ढा उंटवाल, राहुल साकोरे, रामचंद्र शिंदे, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com