India will now lead the world due to progress in all fields
सर्व क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे आता भारत जगाचे नेतृत्व करेल
-डॉ.सतीश रेड्डी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२१ वा पदवीप्रदान
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हा ‘ ब्रँड ‘ येत्या काळात आणखी मोठा होईल. – डॉ.कारभारी काळे
पुणे : भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान, रस्ते वाहतूक, शिक्षण, औषधनिर्माण अशा सर्वच क्षेत्रात गेल्या काही वर्षात प्रचंड प्रगती झाली आहे. पूर्वी भारत अन्य देशांच्या मार्गावर चालत होता मात्र आता भारताच्या मार्गावर जगातील देश चालणार असून भारत जगाचे नेतृत्व करेल असा विश्वास संरक्षण मंत्रालयातील संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ.जी.सतीश रेड्डी यांनी व्यक्त केला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२१ वा पदवीदान समारंभ दिनांक २७ जानेवारी रोजी विद्यापीठातील मुख्य इमारतीजवळच्या हिरवळीवर पार पडला. त्यावेळी डॉ.रेड्डी बोलत होते.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र.कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे आणि कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ.मनोहर चासकर, डॉ पराग काळकर, डॉ.दीपक माने, डॉ.विजय खरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.रविंद्र शिंगणापूरकर, डॉ.सुदर्शन कुमार , वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके, परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक व उपकुलसचिव डॉ.अनिल लोखंडे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. तर व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य आणि विद्या परिषद सदस्य देखील यावेळी उपस्थित होते.
या पदवी प्रदान समारंभानिमित्त एकूण ९६८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी पीएच.डी च्या ७० विद्यार्थ्यांना समारंभात पदवी प्रदान करण्यात आली.
यावेळी डॉ.रेड्डी म्हणाले, सर्व प्रकारच्या प्रगतीचा पाया हा शैक्षणिक संस्था असतात. त्यामुळेच भारतातील शैक्षणिक संस्था या अधिकाधिक सक्षम बनविणे गरजेचे आहे. शिक्षण, संशोधन आणि उद्योग ही साखळी निर्माण होत त्यातून प्रगती व्हावी. यामध्ये भारतातील युवा वर्गाची जबाबदारी मोठी आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हा ‘ ब्रँड ‘ येत्या काळात आणखी मोठा होईल. – डॉ.कारभारी काळे
आपल्या भाषणात डॉ.काळे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आलेख सर्वांसमोर मांडला. यावेळी डॉ.काळे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची शैक्षणिक विभाग आणि संलग्न महाविद्यालयाने केलेल्या कामगिरीमुळे विद्यापीठ एक वेगळा ब्रँड ठरला आहे. भविष्यात या विद्यापीठाची मान आणखी उंचावेल आणि यात तुम्हा विद्यार्थ्यांचा बहुमोल वाटा असेल असेही डॉ.काळे यावेळी म्हणाले.
समारंभाचे सूत्रंसंचालन डॉ.संजय चाकणे यांनी केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com