Nitin Gadkari laid foundation stone for road works in western Maharashtra
पश्चिम महाराष्ट्रातल्या रस्त्यांच्या कामाची नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी
साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती करावी – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
सातारा : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज पश्चिम महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्गांवरच्या विविध टप्प्यांच्या कामाची पायाभरणी आणि लोकार्पण डिजिटल पध्दतीने झाले.
सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी सन २०१४ पर्यंत ४९.०४ कि.मी. होती तर आता ही लांबी ८५८ कि.मी. झाली आहे असे सांगून श्री. गडकरी म्हणाले, आळंदी ते पंढरपूर हा बारा हजार कोटींचा पालखी मार्ग येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल. या मार्गावर वारकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या पालखी मार्गाचे महाराष्ट्रातील साधुंसंताच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. हा उद्घाटनाचा कार्यक्रम भव्य दिव्य असा केला जाईल.
पश्चिम महाराष्ट्रातलं रस्त्यांचं जाळं मजबूत करण्याच्या दृष्टीनं, मंत्रालयानं हे प्रकल्प हाती घेतले आहेत. उंडवडी कडेपठार-बारामती-फलटण या ३३ किलोमीटर लांबीच्या टप्प्याचं चौपदरीकरण आणि काँक्रीटीकरण, शिंदेवाडी-भोर-वरंधाघाट या ५६ किलोमीटर लांबीच्या टप्प्याचं रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण, तसंच याच महामार्गाच्या लोणंद-सातारा या ४६ किलोमीटर लांबीच्या टप्प्याचं मजबुतीकरण या प्रकल्पांचा यात समावेश आहे.
या सर्व रस्ते प्रकल्पांसाठी एकूण १ हजार ५३९ कोटी रुपयांहून जास्त खर्च अपेक्षित आहे.या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र कर्नाटक राज्याशी, तर पश्चिम महाराष्ट्र कोकण विभागाशी जोडला जाणार आहे.संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग यांना जोडणारा महामार्ग, कोकणातल्या बंदरांशी पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महामार्ग याचा यात समावेश आहे.
साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती करावी
महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र ऊस उत्पादनात अग्रेसर आहे. ऊसापासून इथेनॉल निर्मिती करता येते. पेट्रोलपेक्षा इथेनॉलचे दर खूप कमी आहेत. पुढील काळात इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्यात येणार आहे. तरी साखर कारखानदारांनी इथेनॉलच्या निर्मितीसाठी आपला पुढाकार घ्यावा. यातून निश्चितच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com