Priority for creation of infrastructure and favourable environment for industry
पायाभूत सुविधांची निर्मिती आणि उद्योगाला पोषक वातावरण निर्मिती करण्यास प्राधान्य
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘न्यूज १८ लोकमत’ च्या उद्योगरत्न पुरस्कारांचे वितरण
मुंबई : पायाभूत सुविधांचा विकास झाला तर राज्य प्रगतीकडे जाते. त्यामुळे या सुविधा निर्माण करणे, उद्योग वाढीसाठी पूरक वातावरण निर्माण करणे आणि लोकहिताचा कारभार करणे याला राज्य शासनाचे प्राधान्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
न्यूज १८ लोकमतच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उद्योग रत्न पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, गेल्या सहा महिन्यात आमच्या सरकारने राज्याच्या हिताचे शेतकरी, कामगार, महिला, आणि उद्योजक अशा सर्वांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. तीच भावना आणि भूमिका यापुढील काळात कायम राहील. उद्योगांसाठी सबसिडी देणे, त्याला व्यवसायासाठी सुलभ वातावरण निर्मिती, नवउद्योजकाना पाठबळ अशा प्रकारे राज्य शासन काम करत असल्याचे ते म्हणाले.
शहरातील पाचशे किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. यामुळे पावसाळ्यात लोकांना दिलासा मिळेल आणि पुढील अडीच वर्षात खड्डेमुक्त मुंबई पाहायला मिळेल. शहराचे सुशोभीकरण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जात आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
दावोस येथे राज्यात गुंतवणूक करण्यासाठी अनेक उद्योगांनी रुची दाखवली आहे. त्यातील अनेकांनी सामंजस्य करार केले. येत्या काळात राज्यात अनेक मोठे उद्योग आलेले दिसतील, असे त्यांनी सांगितले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा विकासाच्या दिशेने नेणारा आहे. नागपूर – मुंबई हे अंतर कमी झाल्याने अनेक शेतकरी, उद्योजक यांना त्याचा लाभ होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
सिंचन प्रकल्पांना गती, शेतकऱ्यांना भरीव मदत, ज्येष्ठ नागरिक मोफत एसटी प्रवास.
दिवाळीत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय असे अनेक लोकहिताचे निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती त्यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात नवीन प्रकल्प सुरू होत आहेत. हाताला काम मिळाल्याने आणि पायाभूत सुविधा वाढल्याने रोजगार निर्मिती होईल आणि तेथील नक्षलवाद संपेल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
केंद्र – राज्य संबंध चांगले असतील तर राज्याच्या विकासाला त्याचा लाभ होतो. गेल्या काही महिन्यात हे चित्र आपल्याला पाहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात रवी नरहिरे (कळंब, उस्मानाबाद), डॉ. सुजित जे. पी.सिंह, आयुष माहेश्वरी, राहुल राजभर, रवींद्र कुटे आणि केदार संघवी, शिखा गुप्ता आणि आलोक जयस्वाल, डॉ.बिपिन सुळे, लक्ष्मीकांत त्रिवेदी, विकी गावंडे आणि गोल्डी साहू, विनीत चौधरी आणि मयुरेश चौधरी, विनय तिवारी, रोहित अग्रवाल, राकेश राठी, जितेंद्र सिंह राठोड, डॉ. प्रमोद दुबे, सुखदेव शिंदे, दिनकर रत्नाकर, डॉ. प्रवीण बढे यांचा उद्योग रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com