Concepts and suggestions sought directly from the public for the budget
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प; थेट जनतेतून मागितल्या संकल्पना आणि सूचना
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी सादर झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा असावा, यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेतून सूचना आणि संकल्पना मागविल्या आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्प झाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडे जनतेचे लक्ष आहे. 27 फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार असून, लवकरच कामकाज सल्लागार समितीत अर्थसंकल्पीय कामकाजाचे वेळापत्रक ठरेल. महाराष्ट्रात आता अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली आहे. जिल्हाश: डीपीसी आणि विभागश: वार्षिक आराखड्यासाठी बैठकी पूर्ण झालेल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशी अनेक पदे भूषविली. पण, अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे.
‘अर्थसंकल्प कसा वाचावा’ हे पुस्तक त्यांनी आमदार असतानाच लिहिले आहे. अर्थसंकल्पावर अनेक व्याख्याने सुद्धा त्यांनी दिली आहेत. कालही केंद्रीय अर्थसंकल्पावर त्यांचे मुंबईत व्याख्यान झाले.
यंदाच्या आणि आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात जनतेच्या सूचनांचे, संकल्पनांचे प्रतिबिंब असावे, म्हणून त्यांनी थेट जनतेतून सूचना, संकल्पना मागविल्या आहेत. http://bit.ly/MahaBudget23 या संकेतस्थळावर जाऊन लोकांना आपल्या संकल्पना मांडता येणार आहेत. त्यामुळेच निश्चित जनतेच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात असणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com