Three-way or four-way fight in Kasba and Chinchwad constituencies of Pune
पुण्यातल्या कसबा आणि चिंचवड मतदारसंघात बहुरंगी लढत
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काही बंडखोर उमेदवारांसह अनेक अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानं दोन्ही ठिकाणी बहुरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाना काटे यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर आज अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला तर त्याच पक्षाचे राहुल कलाटे यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.
कसबा मतदारसंघात आज स्थानिक काँग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर ब्राह्मण व्यक्तीला भाजपने उमेदवारी नाकारल्याचा आरोप करुन हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही कसबा मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं आता या मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढत पाहायला मिळेल. दोन्ही मतदारसंघात अर्जांची छाननी उद्या होणार असून अर्ज मागे घेण्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी
महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. दोन्ही मतदार संघात दोन तगडे नेते बंडखोरी करणार आहे. त्यामुळे दोन्ही मतदार संघात महाविकास आघाडीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. कसबा मतदार संघात महाविकास आघाडीची उमेदवारी कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना देण्यात आली आहे. तर चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची उमेदवारी राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना घोषित करण्यात आली आहे. या दोघांना उमेदवारी दिल्याने कसब्यात कॉंग्रेसचे तगडे नेते बाळासाहेब दाभेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर चिंचवडमध्ये सगळ्यांचे लोकप्रिय आणि सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेले राहुल कलाटे देखील बंडखोरी करण्यावर ठाम आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com