पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य वेगाने सुरु – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय नियंत्रण कक्षातून घेतला राज्यातील आपत्तीचा आढावा.
अतिवृष्टीमुळे दुर्घटना टाळण्यासाठी डोंगरउतारांवरील गावे व वस्त्यांमधील रहिवाशांनी स्थलांतरासाठी प्रशासनास सहकार्य करावे.
कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन आढावा घेतला तसेच बचाव मदत कार्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दरड कोसळण्याच्या झालेल्या दोन दुर्घटनेतील मृतांबाबत शोक व्यक्त करून अशा प्रकारे डोंगर उतारांवरील गावे व वस्त्या येथील रहिवाशांनी प्रशासनास स्थलांतर करण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले. पुढील दोन ते तीन दिवस हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेऊन प्रशासन आणि नागरीक यांनी दक्षता घ्यावी तसेच समन्वयाने यंत्रणांनी काम करावे, असेही निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुसळधार पाऊस पडल्यामुळे रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदूर्ग कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती आहे. कोयनेतून विसर्ग सुरू झाल्यामुळे सांगली, कोल्हापूर भागात सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, अद्याप पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही. पूरग्रस्त नागरिकांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करावे तसेच अडकलेल्याना अन्नाची पाकिटे, कपडे, औषधी आदि त्वरित मिळतील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.
कोविड रुग्णांची काळजी घ्या
पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांमध्ये कोविड संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. त्यात ही आपत्ती आल्याने कोविड रुग्णांची असुविधा होऊ देऊ नका असे सांगून ते म्हणाले की, आरोग्याचे नियम पाळून, विशेषत: मास्क घालून बचाव कार्यातील लोकांनी काळजी घ्यावी.
एनडीआरएफच्या तुकड्या तैनात
यावेळी बैठकीत ; एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्याविषयी माहिती देण्यात आली. एनडीआरएफच्या एकूण १४ तुकड्या नेमून दिलेल्या जिल्ह्यांत पोहोचल्या असून त्यांची जिल्हानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे : पालघर १, ठाणे २, रायगड २, रत्नागिरी ४, सिंधुदुर्ग १, सांगली १, सातारा १, कोल्हापूर २,
एसडीआरएफच्या नागपूरसाठी २ आणि या रायगड जिल्ह्यासाठी २ अशा ४ तुकड्या बचाव कार्य करीत आहेत. याशिवाय पोलादपूर करिता एनडीआरएफची १ टीम मुंबई येथून हवाई मार्गे पाठविण्यात आली आहे.
तटरक्षक दलाच्या २ , नौदलाच्या २ तुकड्या रत्नागिरी येथे बचाव कार्य करीत आहेत.
राखीव तुकड्या अंधेरी येथे – २, नागपूर येथे १, पुणे येथे १, एसडीआरएफ धुळे येथे १, आणि नागपूर येथे १ अशा तैनात करण्यात आल्या आहेत. आज दुपारपर्यंत एनडीआरएफच्या ८ अतिरिक्त तुकड्या भूवनेश्वर येथून येत आहेत.