Satisfied that the problem of nomadic people has been brought to the government.
भटक्या विमुक्तांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहचवले याचे समाधान..
-भिकूजी इदाते
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापन दिन थाटात साजरा
पुणे : केंद्र शासनाच्या समितीत काम करत असताना सलग तीन वर्ष महाराष्ट्रातील सर्व जिल्हे फिरत एकही दिवस सुटी न घेता काम करून भटक्या विमुक्तांचे प्रश्न हे सरकारदरबारी मांडले याचे मला समाधान आहे, आणि शासनानेही मला पद्मश्री पुरस्कार जाहीर करत माझ्यासारख्या सामान्य माणसाचा सन्मान केला याचा मला आनंद असल्याचे केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या उपसमीतीचे सदस्य भिकुजी (दादा) इदाते म्हणाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भिकूजी इदाते बोलत होते.
यावेळी श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रमचे अजितकुमार सुराणा (शैक्षणिक, सामजिक व उद्योग), मधुकराव पिचड (सामाजिक व राजकीय), प्रसिद्ध कथक नृत्यांगना पंडिता मनिषा साठे(कला), अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील ( शैक्षणिक, सामाजिक), (शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक), प्राज उद्योगसमूहाचे डॉ.प्रमोद चौधरी (उद्योग), विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.रघुनाथ शेवगांवकर (शैक्षणिक), विद्यापीठाच्या माजी व्यवस्थापन परिषद सदस्य सुनेत्रा पवार (शैक्षणिक व सामाजिक) , आदींना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठीय पातळीवरील आणि लोकसाहित्य अभ्यासक प्रा.डॉ.प्रभाकर मांडे यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांनी पुरस्कार स्वीकारला. तर स्वामी गोविंददेव गिरि (मानव्य विकास तत्वज्ञान) यांच्या वतीने महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान न्यासी मंडळाने पुरस्कार स्वीकारला.
युवा गौरव पुरस्काराने प्राजक्ता माळी (कला), प्रीयेशा देशमुख (क्रीडा), डॉ.अमोल वाघमारे (सामाजिक कार्य) यांना सन्मानित करण्यात आले. डॉ.रणजित काशिद (संशोधन) यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांनी पुरस्कार स्वीकारला.
या कार्यक्रमात विद्यापीठाच्या ‘विद्यापीठ वार्ता’ या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
भिकूजी इदाते म्हणाले, मी केलेल्या सर्व सूचना केंद्राने मान्य केल्या याचा मला आनंद आहे परंतु भटक्या विमुक्तांसाठी एक कायमस्वरूपी कमिशन नेमले जावे यासाठी माझा अजूनही लढा सुरू आहे.
यावेळी डॉ.कारभारी काळे यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक कामगिरीचा आढावा घेतला. ते म्हणाले, विद्यापीठाच्या या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मला या विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे.परंतु हे विद्यापीठ ऐतिहासिक स्मरणरंजनात न रमता विद्यापीठ पुढील काळात अनेकानेक विक्रम प्रस्थापित करेल अशी मी कुलगुरू या नात्याने ग्वाही देतो.
पुरस्कार विजेत्या मान्यवरांनीही यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमात विद्यापीठाकडून विविध शैक्षणिक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीदत्त गायकवाड यांनी केले तर आभार डॉ.प्रफुल्ल पवार यांनी मानले.
दरम्यान सकाळी आठ वाजता कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजारोहण मुख्य इमारतीसमोर करण्यात आले. यासाठी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com