Ramesh Bais appointed as the new Governor of Maharashtra
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती
राष्ट्रपती आणि केंद्र सरकारचा राज्यपाल बदलण्याचा निर्णय समाधानकारक – शरद पवार
नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला असून कोश्यारी यांच्या जागी नवे राज्यपाल म्हणून झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे.
रमेश बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ रोजी रायपूर इथं झाला. १९७८ मध्ये ते रायपूर महानगरपालिकेत पहिल्यांदा निवडून आले होते. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख चढता राहिला. १९८० पासून १९८४ पर्यंत ते मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य होते.
१९८९ मध्ये रायपूर लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा खासदार बनले. रायपूर लोकसभा मतदारसंघाचं त्यांनी सात वेळा प्रतिनिधित्व केलं. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात विविध खात्यांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे.
राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेले रमेश बैस हे सध्या झारखंडचे राज्यपाल असून त्यांनी यापूर्वी त्रिपुराचं राज्यपाल पद सांभाळलं होतं.
राष्ट्रपती आणि केंद्र सरकारचा राज्यपाल बदलण्याचा निर्णय समाधानकारक – शरद पवार
राष्ट्रपती आणि केंद्र सरकारनं राज्यपाल बदलण्याचा समाधानकारक निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्वीच घ्यायला हवा होता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलतांना व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर समाधान व्यक्त केलं आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच राज्यात नवीन राज्यपाल येणार असल्याच्या वृत्ताचं आम्ही स्वागत करतो, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेनंही कोश्यारी यांच्या राजीनाम्याचं स्वागत केलं असून हा महाराष्ट्राचा विजय असल्याचं म्हटलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com