A tribal development center will be started immediately at Yashwantrao Chavan Pratishthan in Mumbai
मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आदिवासी विकास केंद्र तात्काळ सुरु करू – शरद पवार
सेवाग्राम : मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आदिवासी विकास केंद्र तात्काळ सुरु करू, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते आज वर्धा जिल्ह्यात गांधी आश्रम, सेवाग्राम इथं सामूहिक वन हक्क धारक आदिवासी आणि इतर पारंपारीक वननिवासी गावांच्या राज्यस्तरीय परिषदेत बोलत होते.
जल, जंगल जमीन यांचं संवर्धन करणारा एकमेव घटक म्हणजे आदिवासी. त्यांचं जीवन समृद्ध करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. यासाठी विदर्भ आणि राज्यातल्या संस्था – संघटनांनी ग्रामसभेच्या प्रतिनिधी, भगिनी आणि कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला, आणि खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण गावांची संकल्पना, तसंच नैसर्गिक साधनसंपत्तीवर स्थानिकांचा अधिकार ही संकल्पना राबवली, असं सांगत त्यांनी परिषदेच्या आयोजकांची स्तुती केली.
ग्रामस्थांच्या उपजीविकेसंदर्भातलं कार्य राज्यस्तरावर उभं राहिलं पाहिजे. तसंच या संघटनांचा एक संघ राज्यस्तरावर निर्माण झाला पाहिजे, असं पवार म्हणाले. यावेळी सामूहिक वनहक्क आणि उपजीविका याबाबत राज्य आणि देश पातळीवर कार्यरत असलेले जेष्ठ कार्यकर्ते, तसंच आमदार अनिल देशमुख, माजी आमदार सुरेश देशमुख उपस्थित होते. विदर्भ, खानदेशातले ग्रामसभा प्रतिनिधी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, तसंच सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांचे ७०० पेक्षा अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com