A ‘Copy-free campaign’ will be implemented to prevent malpractices at examination centres
परीक्षा केद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्यात येणार
पुणे विभागात ‘कॉपीमुक्त अभियान’ यशस्वीरित्या राबवून नवा पुणे पॅटर्न करावा
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे : दहावी, बारावी परीक्षेत परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होऊ नयेत या करिता १०० टक्के कॉपीमुक्त अभियान पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी यशस्वीरित्या राबवावे. पुणे विभागाचा राज्यात नवा पॅटर्न करावा, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) ची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ या कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) ची परीक्षा २ ते २५ मार्च, २०२३ या कालावधीत होणार आहे.
शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून परीक्षा कालावधीत परीक्षा केद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होणार नाहीत. याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक यांचे उदबोधन करण्यात येणार आहे. तसेच अभियानाबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी, परीक्षा सुरळीत व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी विभागनिहाय व जिल्हानिहाय भरारी पथक, दक्षता समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यार्थांच्या जीवनातील दहावी, बारावी हा महत्वपूर्ण टप्पा असतो. या महत्त्वाच्या टप्प्यावर परीक्षा निकोप वातावरणात होणे, त्यातून शिक्षणाचा दर्जा उंचावणे यासाठी हे महत्वपूर्ण अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी ते स्थानिक स्तरावरील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही विभागीय आयुक्त यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com