Shivaji Maharaj created a new nationalism – Pandurang Balakwade
शिवाजी महाराजांनी नवा राष्ट्रवाद निर्माण केला
-पांडुरंग बलकवडे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवजयंती साजरी
पुणे : क्रांतीच्या माध्यमातून अर्थ क्रांती आणि त्यातून समाजक्रांती करत शिवाजी महाराजांनी नवा राष्ट्रवाद निर्माण केला असल्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्याना दरम्यान ते बोलत होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.सोनवणे यांनी जिजामाता यांच्या प्रतिमेस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. तसेच जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रातील शिवाजी महाराज यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस व लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी ठीक दहा वाजता महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले.
यावेळी ढोल ताशा पथक, लेझीम यांच्यासह पारंपरिक वेषातील शिवभक्त यांच्या उपस्थितीत शिवजयंती मिरवणूक काढली. या मिरवणुकीत शिवभक्त विद्यार्थी, लहान मुले, पालक असे सर्वजण सहभागी झाले होते.
बलकवडे म्हणाले, शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी रयतेचे राज्य निर्माण केले. उद्याच्या सशक्त हिंदुस्तानासाठी त्यांनी दहशतमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, विज्ञानवादी राज्य निर्माण केले. अन्याय करणारा कितीही शक्तिशाली असला तरी त्याच्याशी संघर्ष करणे हे आपले आद्य कर्तव्य त्यांनी मानले. त्यांच्या अठरापगड जातींमधील मावळ्यांच्या साथीने त्यांनी स्वराज्य निर्माण केले.
शिवाजी महाराजांविषयी नवा अभ्यासक्रम
आपल्याला ताठ मानेने जगायला शिकवणाऱ्या राजांचा अभ्यास सर्वांनी करावा यासाठी, विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुढील वर्षीपासून विद्यापीठात ‘छत्रपती शिवाजी महाराज कर्तृत्व, विचार आणि व्यवहार’ हा नवीन अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे असे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com