The excitement of Chhatrapati Shivaji Maharaj’s birth anniversary in the state
राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित सर्व किल्ल्यांचं जतन आणि जीर्णोद्धार केलं जाईल
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव आज राज्यभरात सर्वत्रच दिसून येतो आहे. विविध राजकीय पक्ष तसंच सामाजिक संघटनांनीही राज्यभरात शिवजयंतीनिमीत्त कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातल्या छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाऊन शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली.
शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर आयोजित शिवजयंती सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित सर्व किल्ल्यांचं जतन आणि जीर्णोद्धार केलं जाईल अशी घोषणा केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट देऊन, छत्रपती शिवरायांच्या शाही आसनाला आणि शिवस्मारकाला अभिवादन केलं. सातारा जिल्हा प्रशासनानंही किल्ले प्रतापगडावर शिवजंयतीचा सोहळा आयोजित केला होता. यावेळी पोलीस बँड पथकानं राज्यगिताची धून वाजवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.
सोलापूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल मध्यरात्री शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला गेला. हा सोहळा अनुभवण्यासाठी महापालिकेच्या आयुक्त शितल तेली – उगले यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. अनेकांनी मावळ्याची वेशभुषा केली होती. या सोहळ्याला उपस्थित महिलांनी “पाळणा गीत” गात शिवजन्म साजरा केला. यावेळी तलवारबाजीसह शिवकालीन शस्त्रांची प्रात्यक्षिकही सादर केली गेली. शिवजयंतीनिमीत्त राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या वतीनं जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान मोहीम आयोजित केली गेली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासह उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांनी छत्रपतींना अभिवादन केलं. या निमित्तानं ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धूनही वाजवली गेली.
नाशिकमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात राज्य गीताचे सामूहिक गायन करून शिवजयंती साजरी केली गेली. नाशिक शहरात विविध सार्वजनिक मंडळांनी चौका चौकांमध्ये किल्ले आणि शिवकालीन प्रसंगांचे देखावे उभारले आहेत.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं गेलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com