Union Minister Nitin Gadkari lays the foundation of Anubhuti Inclusive Park, the world’s grandest and most unique disabled park.
अनुभूती समावेशी पार्क या जगातील सर्वात भव्य आणि अद्वितीय दिव्यांग पार्कची पायाभरणी
महाराष्ट्रात नागपूर येथे उभारण्यात येणाऱ्या अनुभूती समावेशी पार्क या जगातील सर्वात भव्य आणि अद्वितीय दिव्यांग पार्कची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक समाज घडवण्याच्या संकल्पनेतून हे उद्यान विकसित केले जाणार असून, याद्वारे सहानुभूती नव्हे तर सह-अनुभूतीचे दर्शन घडेल- नितीन गडकरी
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज महाराष्ट्रातील नागपूर येथे उभारण्यात येणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या आणि अद्वितीय दिव्यांग पार्क – अनुभूती समावेशी पार्कची पायाभरणी झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक समाज घडवण्याच्या संकल्पनेतून हे पार्क विकसित केले जाणार आहे, या पार्कमध्ये सहानुभूती नव्हे तर सह – अनुभूतीचे दर्शन घडेल म्हणूनच त्याचे नामकरण अनुभूती दिव्यांग पार्क असे करण्यात आले आहे, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.
या पार्कच्या माध्यमातून केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात सर्वसमावेशकतेचा संदेश पोहचेल. या पार्कमध्ये सर्व 21 प्रकारच्या दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधा असतील, यामध्ये स्पर्श आणि गंध उद्यान, हायड्रोथेरपी युनिट, वॉटर थेरपी, मतिमंद मुलांसाठी आणि त्यांच्या मातांसाठी स्वतंत्र खोली, अशा सुविधा असतील, असे ते म्हणाले.
नागपूर शहर हे देशातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. 2016 मध्ये केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारांसाठी दिव्यांग व्यक्तींचे अधिकार कायदा संमत केला. या कायद्यामुळे दिव्यांगांना प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. याअंतर्गत केंद्र सरकारने पुढाकार घेऊन दक्षिण भारत आणि मध्य प्रदेशात काही दिव्यांग पार्कची निर्मिती केली आहे. या मालिकेत नागपूरच्या पारडी परिसरात दिव्यांग मुलांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हे ‘अनुभूती समावेशी पार्क ‘ उभारले जात आहे, असेही ते म्हणाले.
हे उद्यान जगातील पहिले समावेशी दिव्यांग उद्यान असून 90 हजार चौरस फूट जागेत उभारण्यात येणाऱ्या या उद्यानासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने सुमारे 12 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. येथे दिव्यांग, सर्वसाधारण नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध प्रकल्पांची संकल्पना मांडण्यात आली आहे, असे गडकरी यांनी सांगितले
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com