Journalism students should participate in voter awareness activities – Dr Purushottam Patodkar
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती उपक्रमात सहभागी व्हावे
-डॉ.पुरुषोत्तम पाटोदकर
संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाच्या विद्यार्थ्यांची माध्यमकक्षाला भेट
पुणे : भारत निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनातर्फे कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी मतदार जागृतीचे उपक्रम राबविण्यत येत असून संज्ञापन व वृत्तपत्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीचे समन्वय अधिकारी तथा माहिती उपसंचालक डॉ.पुरुषोत्तम पाटोदकर यांनी केले.
जिल्ह्यातील पोटनिवडणूकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षाला आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. प्रसिद्धी व जनसंपर्क समन्वयक तथा जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, वृत्तपत्र विद्या विभागाचे प्राध्यापक संजय तांबट, सहायक प्राध्यापक योगेश बोरोटे, सहायक संचालक जयंत कर्पे यावेळी उपस्थित होते.
निवडणूक काळात माध्यम संनियंत्रण महत्वाचे असून माध्यम कक्षाच्या माध्यमातून विविध माध्यमांतील निवडणूक विषयक मजकूराची नोंद घेण्यात येते. त्याचप्रमाणे मतदार जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा प्रभाविपणे उपयोग करण्यात येतो. पारंपरिक माध्यमांसोबत समाजमाध्यमांचाही उपयोग यासाठी महत्वाचा आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आणि समाजमध्यमांद्वारे या मतदार जनजागृती अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांना माध्यम कक्षाकडून पार पाडण्यात येणाऱ्या विविध कामांची माहिती याप्रसंगी त्यांनी दिली.
इलेक्ट्रॉनिक माध्यमामधील बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी माध्यम कक्षामध्ये स्थापन करण्यात आलेल्या रेकॉर्डिंग यंत्रणेसह पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, समाज माध्यमे आदींवरील निवडणूक विषयक वृत्त, मजकूराचे अवलोकन तसेच विविध माध्यमातील निवडणूक जाहिराती आणि पेड न्यूज याबद्दल संकलित केलेल्या माहितीचे व कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना संवादाच्या माध्यमातून यावेळी देण्यात आली. माध्यम कक्षात नियुक्त अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com