A memorial will be erected so that the youth will remember the sacrifice of Martyr Shivram Hari Rajguru
हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे बलिदान तरुणांना स्मरणात राहील असे स्मारक उभारणार
– सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोलाचे आहे. असे महान पुरुष आपल्या मातीत जन्माला आले. त्यांनी ज्या भूमीतून इतिहास घडवला, अशा स्थळांचा विकास होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने हुतात्मा राजगुरु यांच्या जन्मस्थळाचा विकास करताना तरुणांना त्यांचे बलिदान नेहमीच स्मरणात राहील असे वीरता, शूरता आणि ऊर्जा देणारे स्मारक उभारण्यात येईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मंत्रालयीन दालनात हुतात्मा राजगुरु जन्मस्थळ परिसराचा विकास होण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या आढावा बैठकीचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री.मुनगंटीवार बोलत होते.
मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील राजगुरू नगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थान व थोरला वाडा हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
स्मारक परिसर विकास आराखड्याचे काम गतिमान पद्धतीने होण्यासाठी या आराखड्याच्या संदर्भात सर्वंकष अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून स्मारकाचे काम जलद गतीने व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आढावा बैठकीच्या माध्यमातून वेळोवेळी निर्णय घेण्यात येत आहेत. त्यासाठी समितीत नेमण्यात आलेल्या सदस्यांनी आपली जबाबदारी समजून वेळेत काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी वेळोवेळी काही सूचना असल्यास त्याची नोंद घेतली जाईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
सर्वंकष आराखडा तयार करण्याच्या सूचना
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळाचा विकास करताना तिथल्या प्रत्येक खांबातून, विटेमधून आणि भिंतीतून स्वातंत्र्य लढ्यातील इतिहासाची अनुभूती देणारे स्मारक उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नियुक्त करण्यात आलेल्या समितीने सर्वंकष आराखडा तयार करावा. हे काम अभियानस्तरावर होणे आवश्यक आहे. या कामात दिरंगाई अथवा टाळाटाळ केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सादर झालेल्या आराखड्यात बरेच बदल आवश्यक असून समिती सदस्यांसह प्रत्यक्ष स्मारकाच्या जागेची स्वतः पाहणी करून आवश्यक बदल सुचवू, असेही मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com