The opposition complaints the government in the state legislature on the issues of loss of farmers and strike of employees
शेतकऱ्यांचं नुकसान आणि कर्मचाऱ्यांचा संप या मुद्द्यांवर राज्य विधिमंडळात विरोधकांनी सरकारला घेरलं
किरकोळ कारणावरुन गोळीबार करुन दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का? अजित पवार यांचा संतप्त सवाल
मोरणा येथे गोळीबार, घटनेत दोन स्थानिकांचा मृत्यू तर एक अत्यवस्थ
मुंबई : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपामुळे पंचनामे वेळेवर होत नसल्यानं शेतकरी अडचणीत आल्याचा मुद्दा विरोधी पक्षांनी आज विधानसभेत मांडला. या संपामुळे विद्यार्थ्यांचंही नुकसान होत असून त्यामुळे सर्व इतर कामकाज बाजूला ठेवून याच विषयावर चर्चा घेण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली.
शेतकऱ्यांचे हाल लक्षात घेऊन संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं असं आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं. गारपिटीमुळे शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झालं आहे, मात्र पंचनामे करायला कोणी नाही. त्यामुळे अध्यक्षांनी जबाबदार व्यक्ती म्हणून या सरकारला आदेश द्यावेत, त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही , अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भावना व्यक्त केल्या.
राज्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत पवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडला आणि सरकारला धारेवर धरलं. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी नियमानुसार ताबडतोब रक्कम जाहीर करावी आणि वाटप सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केली.
संपकरी कर्मचाऱ्यांनी पंचनाम्यासाठी सहकार्याची तयारी दाखवली आहे. त्यानुसार पंचनामे सुरू असून आकडेवारी हातात आल्यावर मदत तातडीनं जाहीर केली जाईल, असं महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी सांगितलं. या उत्तरानं समाधान न झाल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सभात्याग केला. याप्रकरणी विरोधकांनी राजकारण करू नये असं आवाहन गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.
मोरणा येथे गोळीबार, घटनेत दोन स्थानिकांचा मृत्यू तर एक अत्यवस्थ
मुलाच्या गाडीचा अपघात झाल्यावर स्थानिकांशी झालेल्या वादानंतर ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याने सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात मोरणा येथे गोळीबार केला. या घटनेत दोन स्थानिकांचा मृत्यू झाला तर एकजण अत्यवस्थ आहे. किरकोळ कारणावरुन गोळीबार करुन दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी आज विधानसभेत केला. या प्रकरणात मदन कदम आणि त्यांच्या दोन मुलांना अटक केली असली तरी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com