आळंदी येथे ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराचे रविवारी होणार वितरण

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा Shri Sant Dnyaneshwar Maharaj and Sant Tukaram Maharaj Palkhi Ceremony हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

The Gyanoba Tukaram award will be distributed on Sunday at Alandi

आळंदी येथे ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराचे रविवारी होणार वितरण

ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे, ह.भ.प.बाबा महाराज सातारकर, स्वामी श्री गोविंददेव गिरी महंत बाभूळगांवकर शास्त्री यांचा होणार सन्मानश्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा Shri Sant Dnyaneshwar Maharaj and Sant Tukaram Maharaj Palkhi Ceremony हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

पुणे : राज्य शासनाच्यावतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे, ह.भ.प.बाबा महाराज सातारकर, स्वामी श्री गोविंददेव गिरी तसेच महंत बाभूळगांवकर शास्त्री यांना फ्रुटवाला मैदान, आळंदी येथे रविवार २६ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.

संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

५ लक्ष रुपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप असून ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे यांना २०१९-२० साठीचा, ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांना २०२०-२१, स्वामी श्री गोविंददेव गिरी यांना २०२१-२२, महंत बाभूळगांवकर शास्त्री यांना २०२२-२३ साठीचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

यापूर्वी रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लहवितकर, डॉ. यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, श्रीमती उषा देशमुख, ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते, डॉ.किसन महाराज साखरे, मधुकर जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

ह.भ.प.बद्रीनाथ महाराज तनपुरे

ह.भ.प.बद्रीनाथ महाराज तनपुरे हे पंढरपुरातील तनपुरे महाराज आश्रमाचे विद्यमान अध्वर्यू असून वारकरी परंपरा आणि गाडगे महाराजांची परंपरा याचा समन्वय साधणारे संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जातात. साने गुरुजींपासून ते डॉ. दाभोलकरांपर्यंत परिवर्तनाच्या चळवळीतील विविध घटकांशी त्यांचे साहचर्य राहिले आहे. अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक सदस्य व पदाधिकारी तसेच कीर्तनकार व प्रवचनकार म्हणून ते सर्वपरिचित आहेत.

ह.भ.प.बाबा महाराज सातारकर

कीर्तन परंपरेचा वारसा वयाच्या बाराव्या वर्षापासून आपल्या रसाळ आणि गोड वाणीने वैश्विक राजदूताप्रमाणे सांभाळणारे अध्यात्मातील ज्येष्ठ शिरोमणी म्हणजे ह.भ.प.बाबा महाराज सातारकर. बाबा महाराज सातारकरांनी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात,आंध्रप्रदेश अशा अनेक राज्यात शेकडोने कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम केले. जनसेवेसाठी त्यांनी चैतन्य संस्थेची स्थापना करुन या संस्थेद्वारे अनेक वैद्यकीय सेवा पुरविल्या. कित्येक लोकांना संप्रदायाची दीक्षा देऊन व्यसनमुक्त केले.

स्वामी श्री गोविंददेव गिरी

श्रीम श्रीमद्भभागवत कथनाची सात ते आठ पिढ्या परंपरा असलेल्या कुटुंबात स्वामी श्री गोविंददेव गिरी यांचा जन्म झाला. हा समृद्ध ठेवा जपत त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षापासून श्रीमद्भभागवत कथनास सुरवात केली. अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर या जन्मगावी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यांनतर पाडुरंगशास्त्री आठवले यांनी प्रवर्तित केलेल्या तत्वज्ञान या विषयात स्वामी गिरी यांनी पदवी संपादन केली.

वेद-उपनिषदे-पुराणे-रामायण-महाभारत-योगवासिष्ठ या प्राचीन ज्ञानठेव्यांचा विश्वाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी स्वामी गिरी यांनी अखंड प्रयत्न केले. केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, मॉरिशस, म्यानमार, भूतान व नेपाळ आदी देशांमध्ये संस्कृत, हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती यासारख्या विविध भाषांद्वारे दीड हजारांपेक्षाही अधिक व्याखाने व प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञान प्रस्तुत केले आहे.

महंत बाभूळगांवकर शास्त्री

महानुभवाचे अहिंसा हे महत्त्वाचे तत्व तसेच धर्माचे रहस्य आपल्या बोली भाषेत सांगणाऱ्या महानुभाव पंथाने भारतीय तत्वज्ञानात मोलाची भर घातली आहे. अशा या ज्ञानाने समृद्ध पंथात महंत बाभूळगांवकर शास्त्री यांनी १९६९ मध्ये बनापूर आश्रमात प्रवेश केला. त्यानंतर महानुभाव साहित्याचे अध्ययन, मराठी अक्षर ओळख, संस्कृती अध्ययन अशा अनेक बौद्धिक आणि लौकिक ज्ञानाच्या पायऱ्या पार करत विद्यापीठांतून त्यांनी पदवी प्राप्त केली. महानुभाव पंथांच्या वाङ्मयाचा पूर्वरंग अतिशय समृद्ध आणि संपन्न आहे. अशा समृद्ध वाङ्मयास अजून ३९ पुस्तकांनी बाभूळगांवकर शास्त्री यांनी संपन्न केले. आजवर त्यांनी तीन हजारांहून अधिक कीर्तने, प्रवचने केली आहेत.

पुरस्कार प्रदान समारंभाप्रसंगी भक्तीसागर या भक्तीमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.

सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे, कार्तिकी गायकवाड, समीर अभ्यंकर, आसावरी, विशाल भांगे, भजनसम्राट ओमप्रकाश हे भक्तीगायनाचा कार्यक्रम सादर करणार असून कमलेश भडकमकर हे संगीत संयोजन करणार आहेत.

या कार्यक्रमाचे निवेदन प्राची गडकरी करणार असून पुरस्कार प्रदान समारंभप्रसंगी सांस्कृतिक कार्य संचालनालय निर्मित ‘अवघा रंग एक झाला’ व ‘हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील रॉबीनहूड दत्तोबा भोसले मातोळकर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम सर्वांना विनामूल्य असून सर्व रसिक प्रेक्षकांना उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *