Unseasonal rains in many parts of the state
राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी
काही भागात आगामी तीन– चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता
मुंबई : हवामान विभागाकडून राज्यातील काही भागात आगामी तीन– चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसांपासून वातावरणात देखील बदल झाला असून उन्हाची तिव्रता कमी होवून ढगाळ वातावरण झाले आहे. यामुळे हवेत देखील काहीसा गारवा असल्याचे जाणवत आहे.
राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. सातारा जिल्ह्यासह पुणे, धुळे, वर्धा जिल्ह्यातही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
साक्री तालुक्यासह शिंदखेडा तालुक्यामध्ये देखील अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
सकाळपासूनच ढगाळ वातावरण असताना दुपारच्या सुमारास साक्री तालुक्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. त्याचबरोबर शिंदखेडा तालुक्यात देखील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या शेती पिकाला देखील फटका बसण्याची दाट भीती शेतकऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. दिवसभरात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या तापमानात आज कमालीची घट झाली. गेल्या चार-पाच दिवसापासून सातत्यानं वाढत चाललेला तपमानाचा पारा चाळीस अंशावरून थेट २८ अंशापर्यंत घसरला होता. या वातावरणाचा विपरीत परिणाम शहर जिल्ह्यातील फळबागांवर होण्याची तसंच रब्बीची काही पिकं धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर शहर मोहोळसह अनेक तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याची नोंद आहे. हे वातावरण दोन दिवस असंच राहणार असल्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
सातारा शहर, तालुका आणि वाई तालुक्यासह जिल्ह्यच्या विविध भागात आज दुपारनंतर अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह तासभर झालेल्या पावसानं वातावरणातील उष्णता कमी होण्यास मदत झाली आहे. गेल्या 3 दिवसांपासून हा अवकाळी पाऊस हुलकावणी देत होता.
वाशिम जिल्ह्यात कारंजा शहर आणि तालुक्यांतल्या गावांमध्ये आज विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला यामुळे बिजवाई कांदा, भाजीपाला तसेच फळबागांचं नुकसान झालं आहे.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दुपारी दोनच्या सुमाराला अचानक आलेल्या अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणावर गारपीट होऊन अनेक भागांमध्ये वीज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. वीज पडून एका गावात आठ शेळ्यांचा मृत्यू झाला असून अनेक वृक्षही जळाले आहेत शेतातल्या भाजीपाल्यासह इतर पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
अकोल्यातही सकाळी पावसाच्या हलक्या सरी येऊन गेल्या तर दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या हजेरीमुळे वातावरणात गारवा पसरला आहे.
दरम्यान, नांदेड, लातूर तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातही हवामान विभागानं आज पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाचे पुणे इथले प्रमुख के एस होसळीकर यांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीत या तीन जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागानं परभणी जिल्ह्यासाठी येत्या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com