The Chief Minister asserted that the Agriculture Minister is keeping an eye on the situation due to unseasonal rains
अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर कृषीमंत्री लक्ष ठेवून असल्याचं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे अतुट नाते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शरयू नदीच्या तिरी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती
अयोध्या : राज्य सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील असून, अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर कृषीमंत्री लक्ष ठेवून असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल अयोध्येत पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या अनुषंगाने केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले. ‘‘इथून आमचं सगळं सुरू आहे. तिथे कृषी मंत्री आहेत. ते स्पॉटला जातायत. अधिकारी जातायत. शेतकऱ्यांसाठी काय केलं पूर्वीच्या सरकारनं हे आपल्याला माहितेय. घोषणा त्यांनी केल्या आणि पूर्तता आम्ही केली. कशाला बोलायचं. आणि आम्ही सरकार जे आहे संवेदनशील आहे. शेतकरी, बळीराजा संकटातून बाहेर आला पाहिजे, त्याच्यावरची संकटं दूर झाली पाहिजे ही देखील प्रार्थना आम्ही प्रभू रामचंद्राकडे करतोय.’’
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पवार यांनी केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना, टीका करणं हे विरोधकांचं कामच असल्याचं मत व्यक्त केलं. महात्मा गांधीजींचं रामराज्याचं स्वप्न साकार करायचं असेल, तर रामाचं दर्शन घ्यावंच लागेल, असं फडणवीस म्हणाले.
‘‘त्यांचं काम आहे टीका करणं. त्यांना कदाचित आस्था नसेल, आम्हाला आस्था आहे. आणि प्रभु श्रीराम हे एक असं व्यक्तिमत्व आहे, की ज्यांनी राज्यकारभार कसा चालवावा हे आपल्याला सांगितलं. गांधीजींची संकल्पना काय होती? रामराज्याची संकल्पना होती. मग रामराज्याची संकल्पना जर राबवायची असेल तर रामाचं दर्शन तर घेतलंच पाहिजे.’’
दरम्यान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातले अनेक सदस्य तसंच आमदारांनी काल अयोध्येमध्ये श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि महाआरती केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी श्रीरामाच्या नव्या मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली, तसंच हनुमान गढीचं दर्शन घेतलं. लक्ष्मण किला इथं झालेल्या कार्यक्रमात संतमहंतांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा धनुष्यबाण, गदा तसंच श्रीरामांची प्रतिमा देत सत्कार केला.
अयोध्येत उभारल्या जात असलेल्या महाराष्ट्र भवनाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे अतुट नाते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे देशातील अन्य राज्यांसोबत नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहेत, त्यातही महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते अतुट असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत शरयू नदीच्या तीरी केले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शरयू नदीची पूजा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि हजारो भाविकांच्या साक्षीने विशेष महाआरती झाली. शरयू नदीच्या संपूर्ण परिसरात रोषणाई करण्यात आली. संपूर्ण वातावरण भक्तीमय होते. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतावेळी आतषबाजी करण्यात आली. राज्यातून खास गोंधळी लोककलेचे पथक शरयू नदीवर उपस्थित होते. महाआरतीच्या वेळी या पथकानेही आपल्या कलेचे प्रदर्शन केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com