All departments should make more efforts for the promotion of Marathi language
मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी सर्व विभागांनी अधिक प्रयत्न करावे
– जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालयांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य
पुणे : महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ नुसार शासकीय कामकाज १०० टक्के मराठी भाषेतून करणे आवश्यक असून त्यासाठी सर्व विभागांनी मराठी भाषेच्या प्रचार- प्रसारासाठी विविध उपक्रम राबवत अधिक प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा मराठी भाषा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, राज्य शासकीय कार्यालयांमध्ये मराठीचा वापर ज्याप्रमाणे बंधनकारक आहे त्याप्रमाणेच त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालयांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. त्यादृष्टीने मराठी भाषेला उत्तेजन देण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा दिनानिमित्त दरवर्षी उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रत्येक कार्यालयात मराठी भाषा अधिकारी नेमण्यात आले आहेत. शासकीय कार्यालयात मराठी भाषेतील व्यवहारासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयास कळवाव्यात.
उपजिल्हाधिकारी श्री. नाटेकर म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीमध्ये कला, साहित्य, संस्कृती आणि प्रकाशने या क्षेत्रात काम करणाऱ्या व जिल्ह्यात राहणाऱ्या व्यक्तींमधून दोन प्रतिनिधींची नावे नामनिर्देशित करण्यात येणार आहेत. मराठी भाषेच्या प्रसारासाठी शासकीय ग्रंथालयाने आयोजित केलेला ग्रंथप्रदर्शनाचा उपक्रम खूपच चांगला असल्याचे ते म्हणाले.
माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर म्हणाले, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने महाराष्ट्राच्या राज्यगीताच्या स्टँडी लावाव्यात. यामुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या अन्य भाषिकांनाही राज्यगीत माहिती होईल. तसेच १ मे रोजी सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावेत, मराठीतील लुप्त होत असलेले शब्द आणि त्याचे चित्र व माहिती असे पुस्तक तयार केल्यास पुणे जिल्ह्याचा वेगळा उपक्रम होईल. या पुस्तकाचा पुढच्या पिढीला चांगला उपयोग होईल.
यावेळी विविध शासकीय कार्यालयांनी मराठी भाषा संवर्धनासाठी राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसेच शासकीय कार्यालयात दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com