All departments should contribute to prepare the District Development Plan
जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे
– जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
जिल्ह्याची बलस्थाने व क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार आराखडा बनविण्यात येणार
पुणे: जिल्ह्याची बलस्थाने, कमतरता, संधी, आव्हाने या बाबींचे विश्लेषण करून जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाचे प्रारूप मांडणारा ‘जिल्हा विकास आराखडा’ येत्या जुलै पर्यंत अंतिम करायचा असून त्यादृष्टीने सर्व संबंधित विभागांनी आपापल्या विभागाचे आराखडे तयार करून सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
जिल्हा विकास आराखड्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांच्यासह महसूल उपविभागीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. देशमुख यावेळी म्हणाले, केंद्र शासनाच्या २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याच्या संकल्पास अनुसरून प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.
जिल्ह्याची बलस्थाने व क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार आराखडा बनविण्यात येणार आहे. वाहतूक, आरोग्य, वाहननिर्मिती, औद्योगिक उत्पादन, निर्यात क्षेत्र, पर्यटन, कौशल्य विकास, स्टार्ट अप, शैक्षणिक विकास आदी मध्ये पुणे जिल्ह्यात मोठा वाव आहे. योग्य पद्धतीने नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती, अर्थवृद्धी होऊ शकेल. त्यादृष्टीने विभागांनी क्षेत्रनिहाय आराखडे तयार करावेत, असेही डॉ. देशमुख म्हणाले.
यावेळी आयुष प्रसाद म्हणाले, जिल्ह्यात क्लस्टर पद्धतीने विविध क्षेत्रांचा विकास करणे शक्य आहे. त्यासाठी विविध संभाव्य समुहांचा आणि लाभार्थ्यांचा शोध घेऊन काम करायचे आहे. त्यायादृष्टीने संबंधित विभागांनी संबंधित क्षेत्रातील भागधारकांची बैठक घेऊन आराखडे करावेत.
यावेळी श्री. इंदलकर यांनी जिल्हा विकास आराखडा या संकल्पनेविषयी माहिती दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com