New elephant movements in an area can be explained by genetic memories lasting up to five generations
पाच पिढ्यांपर्यंत टिकून राहणाऱ्या जनुकीय स्मृतींद्वारे एखाद्या परिसरात नव्याने होणारा हत्तींचा वावर समजावून घेतला जाऊ शकतो
महाभारतात देखील कोकण परिसरातील हत्तींचा उल्लेख आढळतो: हत्तीतज्ञ आनंद शिंदे
जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने केंद्रीय संचार ब्युरोतर्फे चंदगड, कोल्हापूर येथे विविध कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर : हत्तीला समजून घेऊन उपाययोजना केल्यास हत्ती मनुष्य संघर्षावर तोडगा काढणे सोपे होईल. हत्ती, हा अतिशय हुशार प्राणी असून जे सहजासहजी सांगता येत नाही ते हत्ती सांगतो असे ट्रंक कॉल द वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे आनंद शिंदे म्हणाले, सर्वत्र साजरा होणाऱ्या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ताडोबा येथील अभयारण्यात तीन जणांना ठार करणाऱ्या गजराज नावाच्या हत्तीला शांत करतेवेळी त्यांना आलेले अनुभव तसेच इतरही अनुभव विशद केले.
ते पुढे म्हणाले की “महाभारतात देखील कोकण परिसरातील हत्तींचा उल्लेख आहे, महाभारतात एका ठिकाणी लिहिले आहे की अपरांत भागातील हत्ती लाल असतात, येथील लाल मातीचा रंग प्राचीन ग्रंथात हत्तींच्या रंगाशी जोडण्यात आला आहे. हत्तीचा स्वभाव, वागणे, मानसिक स्थिती या अगदी मनुष्याप्रमाणे असतात आणि प्रेम, राग, हास्य, चेष्टा वगैरे भावना हत्ती सहजपणे व्यक्त करतात. हत्तीची घाणेंद्रिये अत्यंत तीक्ष्ण असून तो सात किलोमीटर पर्यंत दूर असलेला गंध ओळखू शकतो तसेच मानवी कान ऐकू शकणार नाही अशा ध्वनी लहरींद्वारे ते एकमेकांशी सात किलोमीटर पर्यंत संवाद साधू शकतात असे हे अत्यंत हुशार जनावर जर जतन करायचे असेल तर आपण आज सुरू करणाऱ्या प्रयत्नांना यश यायला किमान पाच वर्षे लागतील.”
शिंदे पुढे म्हणाले की आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा हत्ती त्याच्या घरी सुरक्षित असेल तेव्हाच आपण आपल्या घरी सुरक्षित असू यावेळी त्यांनी पुढे माहिती दिली की हत्तीची जनुकीय स्मृती ह्या पाच पिढ्यांपर्यंत टिकून असतात. त्यामुळेच काही परिसरांमध्ये जेथे पूर्वी कधी हत्तीचा वावर नव्हता तेथे अचानक हत्ती दिसतात आणि आपल्याला आश्चर्य वाटते. अशा ठिकाणी हत्तीच्या पूर्वीच्या पिढ्यांचा वावर असण्याची शक्यता असते व त्या जनुकीय स्मृतीद्वारे भौगोलिक खाणाखुणा लक्षात ठेवून हत्तीच्या आत्ताच्या पिढ्या वावर करतात परंतु त्याचे आकलन आपल्याला होत नाही.
यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य पी आर पाटील यांनी मनुष्य आणि प्राणी यांच्या संघर्षांमध्ये मनुष्याकडून जास्त समजूतदारपणाची अपेक्षा व्यक्त केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले
मनुष्य आणि वन्य प्राणी हा संघर्ष ऐरणीवर आला असताना 22 एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्यूरो कोल्हापूर आणि चंदगड, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगड येथे विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मनुष्य वन्य प्राणी संघर्ष या मुद्द्यावरील तज्ञांच्या मार्गदर्शनानंतर घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांकडून परिसरात जनजागृती फेरी काढण्यात आली.
यावेळी वनक्षेत्र अधिकारी श्री नंदकुमार भोसले, वन्यजीव तज्ञ गिरीश पंजाबी तसेच परिसरातील गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते.
ट्रंक कॉल द वाईल्ड लाईफ फाउंडेशन विषयी
महाराष्ट्र वनविभागाने दिलेली 50 गावे आणि त्यात स्वतःहून सामील झालेली आणखी 20 गावे अशा 70 गावांमध्ये वनखात्याच्या परवानगीने ट्रंक कॉल द वाईल्ड लाईफ फाउंडेशन मार्फत हत्ती संवर्धन कार्यक्रम राबवला जात आहे.
कार्यक्रमात हत्ती संवर्धन करण्याबरोबरच माणसाला हत्ती आणि गवे यांच्या बाबतीत शिक्षित करण्याचा प्रयत्न हा सगळ्यात मोठा या कार्यक्रमाचा भाग आहे. आत्तापर्यंत गेली वीस वर्षे फटाके लावून, काटेरी झाडे लावून, खड्डे कडून हत्तीचा मार्ग अडवण्यापेक्षा हत्तीला हत्तीचा कॉरिडॉर देणं, जंगलामध्ये संपत चाललेली अथवा संपलेली त्यांची अन्नसाखळी परत लावणे, त्यांना त्यांचा अधिवास सुरक्षित करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य भाग आहे.
शेतकऱ्यांना अथवा गावकऱ्यांना हत्ती समजल्यास हत्ती आणि मानव यांच्यातला संघर्ष कमी होण्यामध्ये खूप मोठी मदत व्हावी यासाठी संस्था व वनखाते पुढील काही वर्षे सतत प्रयत्नशील राहील.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com