An open stage ‘Anganmanch’ for students, artists..!
विद्यार्थी, कलासक्तांचा एक खुला रंगमंच ‘ अंगणमंच ‘..!
जागतिक आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील ‘ अंगणमंच ‘ या खुल्या रंगमंचावर टाकलेला प्रकाश
पुणे : सीता स्वयंवर पासून ते शेक्सपिअर, संस्कृत, प्राकृत, ग्रीक नाटकांचा प्रवास पाहिलेला, नसरुद्दीन शाह ते प्राजक्ता माळीपर्यंतच्या अनेक पिढ्या अनुभवलेला, समर नखाते यांचे रात्री तीन पर्यंत चालणारे मार्गदर्शन वर्ग अनुभवलेला आणि ललित पौर्णिमेच्या प्रकाशात सादर झालेल्या कलांचा साक्षीदार असणारा ललित कला केंद्रातील खुला रंगमंच म्हणजेच अंगणमंच..! आज जागतिक आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त ( २९ एप्रिल २०२३) या अनेक कलाकार घडवलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील ‘ अंगणमंच ‘ या खुल्या रंगमंचावर टाकलेला प्रकाश.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १९८७ च्या सुमारास संगीत, नाटक आणि नृत्य अश्या प्रयोग कलांचे शिक्षण देणाऱ्या विभागाची स्थापना करण्यात आली. १९९१ साली विभागाला डॉ.सतीश आळेकर हे पाहिले पूर्णवेळ विभागप्रमुख लाभले. तत्कालीन कुलसचिव डॉ. व. ह.गोळे यांचे निवासस्थान असलेली जागा ललित कला केंद्राला देण्यात आली होती. त्यावेळी केंद्राच्या बाजूला असलेल्या जागेत विद्यार्थ्यांसाठी एक खुला रंगमंच असावा अशी मागणी त्यांनी केली त्यानुसार १९९८-९९ या वर्षात ललित मला अंगणमंचाची स्थापना करण्यात आली.
याबाबत माहिती देताना ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ.प्रवीण भोळे सांगतात की, ज्याप्रमाणे विज्ञान केंद्रांसाठी प्रयोगशाळांची गरज असते त्याप्रमाणे ललित कला केंद्रात प्रयोगकलांचे जे शिक्षण दिले जाते त्यासाठी रंगमंचाची आवश्यकता होती. नामदेव सभागृहात आम्हाला इनडोअर तर अंगणमंचावर आम्हाला आऊटडोअर सभागृह डॉ.आळेकर यांच्या प्रयत्नातून मिळाले.
विभागात विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात शारीरिक व्यायाम, दुपारी व्याख्यान आणि संध्याकाळच्या वेळेत तालमी चालतात. सकाळचे व्यायाम आणि तालमी या अंगणमंच येथे चालतात असे डॉ.भोळे यांनी सांगितले.
या मंचावर अनेक मोठ्या गायकांचे सादरीकरण झाले आहेत. त्यामध्ये श्रुती सडोलीकर, आरती अंकलीकर- टिकेकर, लोककलावंत केशव बडगे तर येथेच अतुल पेठे यांचे गोळायुग, विजय केंकरे यांचे मिडिया, तू वेडा कुंभार अशी अनेक नाटके सादर झाली आहेत.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक इब्राहिम अलकाजी, नसरुद्दीन शाह, समर नखाते, नाना पाटेकर यांसारख्या मंडळींनी याच मंचावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. अभिनेत्री अनिता दाते, मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी अशा प्रसिद्ध अभिनेत्री आणि विभागाच्या माजी विद्यार्थीनींच्या जडणघडणीचा साक्षीदार सुद्धा हा अंगणमंच आहे असेही डॉ.भोळे आवर्जून सांगतात.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com