‘Madhumitra’ award for beekeepers in the state
राज्यातील मधमाशा पालकांसाठी ‘मधुमित्र’ पुरस्कार
मधमाशा पालनात भरीव काम करणाऱ्या महिला व पुरुष मधपाळांचा समावेश यामध्ये करण्यात येणार
पुणे : राज्यातील मधमाशा पालकांना राज्यस्तरीय मधुमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने राज्यातील मधमाशा पालनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी सभापती रवींद्र साठे यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.
राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळ मधमाशापालनाच्या विविध योजना राबवित आहे. राज्यात मधमाशापालनाला खूप मोठा वाव आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मधमाशापालनाकडे वळावे, या बाबत लोकांच्यात जनजागृती व्हावी आणि मधमाशापालनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी यावर्षीपासून ‘मधुमित्र’ या पुरस्कारांची घोषणा केली आहे. मधमाशा पालनात भरीव काम करणाऱ्या महिला व पुरुष मधपाळांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे.
या पुरस्कारांचे वितरण २० मे या जागतिक मधमाशी दिनानिमित्त महाबळेश्वर येथील मध संचलनालय येथे होणार आहे. पुरस्कारामध्ये रोख रक्कम, शाल श्रीफळ व सन्मानपत्राचा समावेश आहे. या पुरस्कारांमध्ये जास्तीत जास्त मधपालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री.साठे यांनी केले आहे.
खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सर्व जिल्हा कार्यालयांत पुरस्कारासाठी अर्ज उपलब्ध आहेत. अर्ज पाठवण्याची अंतिम मुदत १२ मे पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी डी.आर.पाटील ( ९४२३८६२९१९) यांच्याशी संपर्क साधावा.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com