India is ready to implement technology-based treatment methods for diabetes
मधुमेहावर तंत्रज्ञानाधारित उपचार पद्धती राबवण्यासाठी भारत सज्ज
– केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
भारत आरोग्य सेवेच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या दृष्टीने वेगाने प्रगती करत आहे जी इतर देशांच्या तुलनेत खूपच जलद आहे
नवी दिल्ली : मधुमेहावर तंत्रज्ञानाधारित उपचार पद्धती राबण्यासाठी भारत सज्ज आहे असे, मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत कालपासून ‘डायबेटिस टेक्नॉलॉजी अँड थेराप्युटिक्स 2023’ (DTechCon 2023) या तीन दिवसीय जागतिक संमेलनाला (वर्ल्ड काँग्रेस) सुरूवात झाली. या संमेलनात डॉ. जितेंद्र सिंह प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.
डॉ. जितेंद्र सिंह हे स्वतः नावाजलेले मधुमेह उपचार तज्ञ आहेत. भारताने कोविड साथीविरोधात दिलेल्या यशस्वी लढ्यानंतर, आरोग्यसेवा क्षेत्राबाबत अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तंत्रज्ञान तसेच मनुष्यबळाच्या बाबतीत आपण इतर देशांच्या तुलनेत खूप पुढे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारत अधिकाधिक तंत्रज्ञानस्नेही देश म्हणून वेगाने वाटचाल करू लागला असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपजतच विज्ञानविषयक उत्तम समज आहे, गेली नऊ वर्षे आपण त्यांच्यासोबत अगदी जवळून काम करत आहोत, आणि ते नेहमीच आपल्या सहकाऱ्यांना नव्या कल्पना मांडण्यासाठी तसेच त्या प्रत्यक्षात साकारण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य देतात असाच आपला अनुभव आहे, असेही डॉ. जितेंद्र सिंह यांनी नमूद केले.
अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय क्वांटम मिशन सुरू करायला मान्यता दिली आहे. या अभियानामुळे देशभरात वैद्यकीय निदान आणि उपचारांमध्ये गतिमानता येईल असे त्यांनी सांगितले. भारत हा राष्ट्रीय क्वांटम मिशन सुरू करणाऱ्या जगातील मोजक्या देशांपैकी एक असल्याचेही डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी अधोरेखित केले.
आपल्या देशात टेलिमेडिसिनच्या क्षेत्रातील जगातले काही सर्वोत्तम स्टार्ट अप्स आहेत, या या स्टार्ट अप समूहांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित डॉक्टर विकसित केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग होत असल्याचे सांगताना त्यांनी त्यांच्या मतदार संघात, आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सुमारे ६० दुर्गम गावांची निवड करून, तिथे ‘डॉक्टर ऑन व्हील्स’ नावाची टेलिमेडिसिन व्हॅन सेवा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या सर्व ६० गावांमध्ये, तीन महिने ही सेवा चालवली आणि त्यामार्फत अतिशय कमी काळात सर्वोत्कृष्ट समुपदेशन सेवा उपलब्ध करून देता आल्याचा अनुभवही डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितला.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, भारत केवळ तंत्रज्ञानामध्येच नेतृत्व करू लागलेला नसून एक मोठे वैद्यकीय पर्यटन केंद्र बनू लागला आहे.
मंत्र्यांनी सांगितले की, मधुमेह संशोधनात भारत जगात आघाडीवर आहे, केवळ मधुमेह रोखणे एवढेच आपले आरोग्यसेवेसाठीचे कर्तव्य नसून राष्ट्र उभारणीचेही आपले कर्तव्य आहे कारण,या देशात 70 टक्के लोकसंख्या ही 40 वर्षांखालील आहे आणि आजचा हाच युवा वर्ग (@2047) या वर्षापर्यंत भारताचे प्रमुख नागरिक बनणार आहेत.
डायबिटीज मेलिटस आणि इतर संबंधित विकार किंवा त्यापासून उद्भवणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्या यामध्ये या युवा वर्गाची ऊर्जा वाया जाऊ देणे आम्हाला परवडणारे नाही, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला.
या परिषदेची संकल्पना मांडल्याबद्दल मंत्री महोदयांनी डी. टेक(इंडिया)चे संस्थापक डॉ. बंशी साबू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
डॉ. ताडेज बट्टेलिनो हे या एटीटीडी परिषदेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. भारत आरोग्य सेवेच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या दृष्टीने वेगाने प्रगती करत आहे जी इतर देशांच्या तुलनेत खूपच जलद आहे याबाबत बट्टेलिनो यांनी यावेळी सहमती व्यक्त केली.
डीटेककॉन 2023 (DTechCon 2023) ही एक मधुमेह संबंधित तंत्रज्ञानाशी आणि चिकित्सापद्धती विषयीची जागतिक परिषद आहे. (World Congress of Diabetes Technology & Therapeutics) जी तंत्रज्ञान आणि उपचारशास्त्राच्या क्षेत्रातील नवीनतम संशोधनाला समर्पित आहे. याव्यतिरिक्त, इन्सुलिन पंप, सततचे ग्लुकोज मॉनिटरिंग, पॉइंट ऑफ केअर आणि फ्युचरिस्टिक थेरपी याविषयीची सखोल माहिती घेण्यासाठी कार्यशाळा आणि प्रशिक्षणाचे आयोजनही करण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com