बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन. मान्यवरांकडून श्रद्धांजली.

बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन. मान्यवरांकडून श्रद्धांजली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.  Nandu Natekar

भारताच्या क्रीडा जगतात, नंदू नाटेकर यांचे विशेष स्थान आहे. ते उत्कृष्ट बॅडमिंटनपटू आणि महान मार्गदर्शक होते. त्यांचे यश, नवोदित खेळाडूंना सदैव प्रेरणा देत राहील. नाटेकर यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांचे कुटुंबीय आणि स्नेहीजनाच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे. ओम शांती !

ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा लौकिक नंदू नाटेकर यांनी उंचावला. त्यांच्या कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्राला झळाळी मिळाली. तरूणांना या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा मिळाली. होतकरू खेळाडूंसाठी ते आदर्श ठरले. त्यांच्या निधनामुळे क्रीडाक्षेत्रातील मार्गदर्शक असं व्यक्तिमत्त्व हरपले आहे. नाटेकर यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान महाराष्ट्राच्या चिरंतन स्मरणात राहील. महाराष्ट्र सुपुत्र, महान खेळाडू नंदू नाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनला देशात लोकप्रियता मिळवून दिली. भारतीय बॅडमिंटनची आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण केली. भारतीय खेळाडू आज आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवित असलेले यश नंदू नाटेकर यांनी त्याकाळात रचलेल्या भक्कम पायावर उभे आहे. नंदू नाटेकर यांचे निधन ही बॅडमिंटन क्षेत्राची, राज्याच्या क्रीडाविश्वाची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचे स्मरण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनमध्ये मिळवलेले यश हे औपचारिक प्रशिक्षणाशिवाय स्वकष्टावर मिळवलेलं यश होतं. असे असले तरी ते अनेक उदयोन्मुख खेळाडूंसाठी मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत होते. अर्जुन पुरस्काराने त्यांचा झालेला गौरव हा भारतीय बॅडमिंटनक्षेत्राचा गौरव होता. भारतीय बॅडमिंटनचा आणि महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या या महान खेळाडूला भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *