Direction to take joint action regarding encroachment at Khadki Railway Station Junction
खडकी रेल्वे स्टेशन जंक्शन येथील अतिक्रमणाबाबत संयुक्तपणे कारवाई करण्याचे निर्देश
औंध रोड-खडकी रेल्वे जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन
पुणे : औंध रोड-खडकी रेल्वे जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्यादृष्टीने रस्त्याला लागून असलेले अतिक्रमण काढण्यासाठी पुणे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि खडकी कटक मंडळाने संयुक्तपणे कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.
औंध रोड-खडकी रेल्वे जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, खडकी कटक मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ.देशमुख म्हणाले, या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याबाबत रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातूनही निर्देश देण्यात आले आहेत. या परिसरातील वाहतूकीची समस्या लक्षात घेता महानगरपालिकेने वाहतूककोंडीस कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे काढण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच कटक मंडळाच्या सहकार्याने ती दूर करावीत. यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, असे त्यांनी सांगितले.
आमदार श्री.शिरोळे यांनी परिसरातील वाहतूककोंडीची माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने खडकी रेल्वे जंक्शन परिसरातील मार्गावर वाहतूकीचा ताण येत असल्याने तेथील अतिक्रमण काढून मार्ग मोकळा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com