The airport terminal building should be a testament to the rich, glorious history of Kolhapur
कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली इतिहासाची प्रचिती देणारी विमानतळ टर्मिनल इमारत व्हावी
– केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया
इमारतीचे लोकार्पण दसऱ्यापूर्वी होण्यासाठी कामे गतीने पूर्ण करा
कोल्हापूर: कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. विमानतळावर देश विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली इतिहासाची प्रचिती येईल, अशा पद्धतीने कोल्हापूर विमानतळाची नवीन टर्मिनल इमारतीची बांधणी करा, अशी अपेक्षा व्यक्त करुन येत्या दसऱ्यापूर्वी इमारतीचे लोकार्पण होण्याच्या दृष्टीने जलदगतीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केल्या.
कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीच्या कामाची पाहणी आज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केली, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार अपराजिता सारंगी, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक रमेश कुमार, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रोजेक्ट प्रमुख प्रशांत वैद्य, समरजीतसिंह घाटगे, महेश जाधव, सत्यजित कदम, चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री. सिंधिया म्हणाले, विमानतळ टर्मिनल इमारतीचे प्रवेशद्वार हे दगडी बांधकामातून करा, येथील कामानींवर मशालीच्या प्रतिकृती ठेवा, ज्यामधून कोल्हापूरचा समृद्ध ऐतिहासिक वारसा प्रतिबिंबित होईल. इमारतीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, प्रसिद्ध वस्तू, उत्पादने, कला, संस्कृती, उद्योग यांची छायाचित्रे, व्हिडीओ वॉल आदी बाबींचा समावेश याठिकाणी करा, अशा सूचना केल्या.
प्रवेशद्वाराजवळ विस्तीर्ण बगीचा तयार करुन यामध्ये छत्रपती राजाराम महाराजांचा आकर्षक पुतळा बसवावा. या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. भविष्यात कोल्हापूर विमानतळावरुन अधिकाधिक विमान सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून आतापर्यंत झालेल्या कामाचे श्री. सिंधिया यांनी कौतुक केले.
विमानतळ टर्मिनल परिसरात तयार करण्यात येणारा प्रशस्त बगिचा, याठिकाणी उभारण्यात येणारा छत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा, पर्यटन स्थळांवर आधारित छायाचित्रे व व्हिडीओ वॉल आदी बाबींबाबत जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी चर्चा केली.
61 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या इमारतीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून आतापर्यंत सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती यावेळी अनिल शिंदे यांनी दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com