Planning of 5000 buses by ST for Pandharpur Ashadhi Yatra
पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीतर्फे ५ हजार बस गाड्यांचं नियोजन
आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाड्यांचे नियोजन
चार तात्पुरती बस स्थानके उभारणार
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं भरणाऱ्या यात्रेसाठी एसटी महामंडळानं विविध आगारांमधून ५ हजार बस गाड्यांचं नियोजन केलं आहे. यात औरंगाबाद आणि पुण्यातून प्रत्येकी १ हजार २५०, नाशिक १ हजार १००, अमरावती ७५०, मुंबई ५४०, तर नागपुरातून ११० गाड्यांचं नियोजन केलं आहे.
सोलापूर विभागातल्या नऊ आगारांमधून २५० जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. एकादशीसाठी पंढरपूरला जाणार्या भाविकांसाठी २५ जूनपासून रोज ज्यादा गाड्या सोडल्या जात आहेत. ३ जुलैपर्यंत ही वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव यांनी दिली.
चार तात्पुरती बस स्थानके उभारणार
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान,यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय,संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com