Effective implementation of the ‘Nirmalwari’ initiative on behalf of the Alandi Municipal Council
आळंदी नगरपरिषदेच्यावतीने ‘निर्मलवारी’ उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेच्यावतीने ‘निर्मलवारी’ उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी
पालखी प्रस्थान झाल्यानंतर पुढील आठ तासात इंद्रायणी घाटासह संपूर्ण आळंदी शहरातील स्वच्छता पूर्ण
वारीप्रस्थानानंतर राबविण्यात आलेल्या स्वछता मोहिमेअंतर्गत ६० टन कचऱ्याचे संकलन
पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेने ‘निर्मलवारी’ उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानानंतर सोहळ्यातील मांगल्याचे वातावरण कायम ठेवत संपूर्ण आळंदी शहरात स्वच्छता करण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली आहे.
आषाढी वारी कालावधीत गर्दीच्या अनुषंगाने शहरात निर्माण होणाऱ्या घनकचरा, रस्ते साफसफाई, औषध फवारणी, धुर फवारणी आदी कामे तीन पाळीमध्ये करण्यात आली. शहरातील नगरपरिषद मालकीचे सर्व सार्वजनिक शौचालयाचे एकूण ३५६ सिट्स, सुलभ शौचालयाच्या एकूण ४९० सिट्स तसेच १ हजार ५०० फिरते शौचालय भाविकांना वापरण्यासाठी पूर्णवेळ उपलब्ध करुन देण्यात आले. तसेच ते वापरण्यायोग्य राहतील याची पालिकेने दक्षता घेतली. यासाठी १०० सेवेकऱ्यांनाही सहभागी करुन घेण्यात आले.
शहरात संसर्गजन्य आजार पसरू नये याकरीता शहरात नियमितपणे जंतूनाशके व धुर फवारणी करण्यात आली. पालखी प्रस्थाच्या अगोदच्या रात्री १०० सफाई कर्मचाऱ्यामार्फत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यामुळे पालखी प्रस्थान झाल्यानंतर पुढील आठ तासात इंद्रायणी घाटासह संपूर्ण आळंदी शहरातील स्वच्छता पूर्ण झाली असून रोगराई प्रतिबंधकरीता आवश्यक ती फवारणीदेखील पूर्ण करण्यात आली आहे.
नगरपरिषदेच्या एकूण १२ घंटागाड्या, ३ कॉम्पाक्टर, ५ ट्रॅक्टर, २ सक्शन मशीन आदी वाहनांसह साधारण १०० सफाई कर्मचारी पूर्णवेळ कार्यरत होते. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यासोबतच १०० सेवेकऱ्यांना स्वच्छतेच्या कामात सहभागी करून घेण्यात आले. वारीप्रस्थानानंतर राबविण्यात आलेल्या स्वछता मोहिमेअंतर्गत ६० टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. इंद्रायणी घाटासह गर्दीच्या ठिकाणांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देवून मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवकांना स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेतल्याने आळंदी नगरपरिषद आळंदी शहर स्वच्छ करण्यास मदत झाल्याची माहिती नगरपरिषचे मुख्याधिकारी श्री.केंद्रे यांनी दिली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com