For Vidyavachaspati Degree in Marathi Dr. Madhura Jayaprakash Koranne New Prize
मराठी विषयातील विद्यावाचस्पती पदवीसाठी डॉ. मधुरा जयप्रकाश कोरान्ने नवे पारितोषिक
पुणे: मराठी विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्याकडून डॉ. मधुरा जयप्रकाश कोरान्ने पारितोषिक जाहीर करण्यात आले. हे पारितोषिक मराठी विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या संशोधन केंद्रात विद्यावाचस्पती पदवीसाठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यास त्या त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट प्रबंधास देण्यात येईल. यासंदर्भातल्या नियम व अटी मराठी विभागाने निश्चित केल्या आहेत.
डॉ. मधुरा कोरान्ने ह्या मराठीतील प्रतिथयश अभ्यासक म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मराठी विषयात सुवर्णपदकही प्राप्त केले होते. तसेच पदव्युत्तर शिक्षणानंतर विद्यापीठाची विद्यावाचस्पती पदवीदेखील प्राप्त केली होती. आधुनिक मराठी साहित्य आणि रंगभूमी हे त्यांच्या आस्थेचे विषय होते.
मराठी भाषा अभ्यासाला प्रोत्साहन मिळावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांचे कुटुंबीय देणगीदार श्री. जयप्रकाश कोरान्ने यांनी मधुरा कोरान्ने यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मानवविद्याशाखेतील मराठी विषयातील विद्यावाचस्पती पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास एक स्मृती पुरस्कार द्यावा असा मानस विद्यापीठाकडे व्यक्त केला. त्यांच्या इच्छेचा आदर करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून त्यांच्या मनोदयाप्रमाणे तत्कालीन व्यवस्थापन परिषद सदस्य प्रसेनजीत फडणवीस ह्यांच्या पुढाकारातून या पुरस्कारासाठी एक लाख रुपये रक्कम स्वीकारण्यात आली.
दरवर्षी पीएचडी पदवी सर्वोत्तम प्रबंध लेखनासाठी एक लाख रुपयांच्या व्याजाच्या रकमेतून हा पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. या पुरस्कारासंदर्भातल्या नियम व अटी मराठी विभागाकडून निश्चित करण्यात आल्या.
यावेळी मा. कुलगुरू प्रोफेसर सुरेश गोसावी, कुटुंबीय केतकी कोरान्ने- कुलकर्णी, जयप्रकाश कोरान्ने, निखिल कोरान्ने, व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, भाषा व साहित्य प्रशाला संचालक प्रभाकर देसाई आणि विभागप्रमुख तुकाराम रोंगटे उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com