राज्यात ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेची ऊर्जा निर्मिती होणार

Electricity Image हडपसर मराठी बातम्या Hadapsar News, Hadapsar Latest News.

5 thousand 220 MW power generation will be done in the state

राज्यात ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेची ऊर्जा निर्मिती होणार

– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर

महानिर्मितीने सौर, जल, पवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी गती द्यावी

महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि एसजेवीएन यांच्यात सामंजस्य करार

Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,
File Photo

मुंबई : ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड (एसजेवीएन) यांच्यामध्ये ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या माध्यमातून सुमारे ४१ हजार कोटींची गुंतवणूक आणि ६ हजार ७६० रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.

आज सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि एसजेवीएन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महाजेनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी.अन्बलगन, सतलज जलविद्युत निगम लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक गीता कपूर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, मेडाच्या महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

केंद्र आणि राज्य शासन नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देत आहे. २०३० पर्यत स्थापित क्षमतेच्या ५० टक्के विजेची पूर्तता नवीकरणीय ऊर्जेद्वारे करावयाची आहे.

ऊर्जा स्थिरतेसाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवणुकीची गरज आहे. त्यासाठी महानिर्मितीने सौर, जल, पवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी गती द्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केल्या.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ४०० एकर परिसरात १०० मे.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे विद्युत देयके कमी करण्यासाठी महानिर्मितीकडून स्वतंत्रपणे ५०० कि.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पही विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पास ४७२.१९ कोटी खर्च अपेक्षित आहे.

महाऊर्जा -पुणे (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण)

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या जागेवर चाळकेवाडी येथे २५.६ मे.वॅ. क्षमतेचे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी ५१८ कोटीची गुंतवणूक होणार आहे.

सतलज जलविद्युत निगम लिमिटेड अंतर्गत

सतलज जल विद्युत निगम लिमिटेड आणि महानिर्मिती यांच्यामार्फत ५ हजार मे.वॅ.क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सौर, जल, पवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *