Prize money to the medal-winning athletes and their guides of World Shooting Championships including ‘Commonwealth’
‘राष्ट्रकुल’सह जागतिक नेमबाजी स्पर्धेतील पदक विजेते खेळाडूंसह त्यांच्या मार्गदर्शकांना पारितोषिकाची रक्कम जमा
आंतरराष्ट्रीयस्तरावर उल्लेखनीय कामगिरी तसेच राज्याचे नाव उज्ज्वल करून पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना रोख बक्षीस देवून गौरविण्याची योजना
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मधील सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूंना- ५० लाख रुपये
मुंबई, : राष्ट्रकुल स्पर्धा २०२२, जागतिक नेमबाजी स्पर्धा २०२२ मधील पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना मंजूर रोख पारितोषिकाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, असे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने कळविले आहे.
राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक व्हावे, राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीयस्तरावर दर्जेदार कामगिरी करून पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभूत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून क्रीडा धोरण तयार करण्यात आले आहे.
या धोरणांतर्गत आंतरराष्ट्रीयस्तरावर उल्लेखनीय कामगिरी तसेच राज्याचे नाव उज्ज्वल करून पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना रोख बक्षीस देवून गौरविण्याची योजना संचालनालयस्तरावर कार्यान्वित आहे. त्यानुसार २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक प्राप्त सात खेळाडू व त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांसह कैरो (इजिप्त) येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धा २०२२ मधील पदक प्राप्त चार खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना द्यावयाच्या रोख रकमेत मुख्यमंत्र्यांनी वाढ करून पदक प्राप्त खेळाडूंना रोख रक्कम जाहीर केली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मधील पदक प्राप्त खेळाडूंना जाहीर रकमेचा तपशील असा (अनुक्रमे खेळाडू व मार्गदर्शक या क्रमाने) : सुवर्ण पदक- ५० लाख रुपये, १२ लाख ५० हजार रुपये. रौप्य पदक – ३० लाख रुपये, ७ लाख ३० हजार रुपये. जागतिक नेमबाजी स्पर्धा २०२२ मधील पदक प्राप्त खेळाडूंना जाहीर रकमेचा तपशील असा (अनुक्रमे खेळाडू व मार्गदर्शक या क्रमाने) : सुवर्ण पदक वैयक्तिक– दीड कोटी रुपये, सात लाख ५० हजार रुपये, सुवर्ण पदक सांघिक – ५० लाख रुपये, सात लाख ५० हजार रुपये. रौप्य पदक (सांघिक) – ३० लाख रुपये, पाच लाख रुपये. कांस्य पदक (सांघिक) : २० लाख रुपये, २ लाख ५० हजार रुपये.
पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली रोख पारितोषिकाची रक्कम सर्व संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यास क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी मान्यता दिली असून मंजूर रोख पारितोषिकाची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही संचालनालयस्तरावर प्राधान्याने सुरू आहे, असेही सहसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी कळविले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com