या वर्षी आझादी का अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाचा एक विशेष कार्यक्रम.
राष्ट्रगीत गा, रेकॉर्ड करा आणि व्हिडीओ RASHTRAGAAN.IN वर अपलोड करा.
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाचे संस्मरण म्हणून ‘आझादी का अमृतमहोत्सव’ देशभर साजरा करण्यात येत आहे. या सोहळयात नागरीकांना सहभाग घेता यावा म्हणून अनेक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. सर्वदूरच्या भारतीयांमध्ये अभिमान आणि एकात्मतेची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने ऱाष्ट्रगीताशी संलग्न असाच एक कार्यक्रम सांस्कृतिक मंत्रालयाने यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी आयोजित केला आहे. लोकांनी राष्ट्रगीत गाऊन आपला व्हिडीओ www.RASHTRAGAAN.IN या संकेतस्थळावर अपलोड करावा अशी यामागील संकल्पना आहे. अनेकांनी गायिलेल्या राष्ट्रगीताचे संकलन 15 ऑगस्ट 2021 रोजी थेट प्रक्षेपित केले जाईल.
महत्वपूर्ण
- WWW.RASHTRAGAAN.IN येथे क्लिक करा, आपला व्हिडीओ अपलोड करा आणि आजादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमाचा भाग व्हा.
- या राष्ट्रगीतांचे संकलन 15 ऑगस्ट 2021 रोजी थेट प्रक्षेपित केले जाईल
- ‘आजादी का अमृतमहोत्सव’ हा भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणारा विशेष सोहळा आहे.
मन की बात च्या 25 जुलै रोजीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या कार्यक्रमाचा भाग म्हणून या उपक्रमाची घोषणा केली होती. “जास्तीत जास्त भारतीयांनी एकत्र राष्ट्रगीत गावे असाच सांस्कृतिक मंत्रालयाचा प्रयत्न असेल. यासाठी Rashtragan.in हे संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळाच्या मदतीने लोकांनी आपले राष्ट्रगीत गाऊन रेकॉर्ड करावे, आणि त्या माध्यमातून या मोहिमेशी जोडून घ्यावे. या महान कार्यात प्रत्येकाने आपला सहभाग द्यावा”, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन बात’ मध्ये केले होते.
स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी 75वे वर्ष साजरे करण्यासाठी लोकांना राष्ट्रगीत गाऊन रेकॉर्डिंग करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि इशान्य प्रदेश विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज स्वतः राष्ट्रगीत गाऊन रेकॉर्ड केले.
महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमातून 12 मार्च रोजी ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या कार्यक्रमाच्या आरंभाद्वारे 15 ऑगस्ट 2022 रोजी असणाऱ्या भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाची उलटी गणती सुरू झाली. तेव्हापासून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाशी संबधीत अनेक कार्यक्रमांचा जम्मू काश्मीर ते पुद्दुचेरी आणि गुजरात ते ईशान्य भारत असा देशभर आरंभ होत आहे.