रस्ते सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी

Road safety measures should be implemented effectively

रस्ते सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

राज्यातील समृद्धी महामार्ग तसेच मुंबई – पुणे एक्सप्रेस वे यासह राष्ट्रीय, राज्य महामार्ग, तसेच जिल्हा रस्त्यावरील सुरक्षित प्रवासासाठीच्या उपाययोजनांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता

मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी रस्ते सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिले.

Legislative Council Deputy Speaker Dr. Neelam Gorhe Hadapsar News Hadapsar Latest News हडपसर मराठी बातम्या
File Photo

खासगी बसची गुणवत्ता व नियमावलीची अंमलबजावणी, महामार्गावरील सुरक्षा तसेच अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजनांच्या विधानभवन येथे आयोजित आढावा बैठकीत उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी आमदार दीपक चव्हाण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव स. शं. साळुंखे, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महामार्ग वाहतूक पोलीस अधीक्षक श्री. साळवे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सतीश गौतम यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

रस्ते अपघातांच्या घटनांतील जबाबदार घटकांची निश्चिती करुन त्यावर तातडीने निर्बंध घालण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्याचे निर्दशित करुन उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की राज्यातील समृद्धी महामार्ग तसेच मुंबई – पुणे एक्सप्रेस वे यासह राष्ट्रीय, राज्य महामार्ग, तसेच जिल्हा रस्त्यावरील सुरक्षित प्रवासासाठीच्या उपाययोजनांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे. वाहन चालवणाऱ्या खासगी तसेच इतर सर्व वाहकांसाठी वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे प्रबोधन, समुपदेशन उपक्रम महामार्ग पोलीस यंत्रणा, परिवहन यांच्यामार्फत राबवण्यात येत आहेत. यामुळे संभाव्य अपघात वेळीच रोखता येणे शक्य होत असले तरी रस्ते अपघातांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भरीव उपायांची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने वाहन चालवणाऱ्यांसाठी वाहतूक शिष्टाचार मार्गदर्शिका तसेच सुरक्षित वाहन चालवण्यासाठीची प्रमाणपद्धती (एसओपी) तयार करावी. वाहनचालकांसाठी नियमितपणे आरोग्यतपासणी, प्रवासादरम्यान रस्त्यावर त्यांच्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिले.

महामार्ग पोलीस आणि परिवहन विभागाने एकत्रितरित्या दक्षता समित्या स्थापन करुन त्यांची तिमाही बैठक घ्यावी. त्याचसोबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीच्या बैठकांमधील सूचनांवर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचे नियंत्रण राज्यस्तरावरुन करावे. परिवहन विभागाने प्रामुख्याने समृद्धी व अशा महामार्गावर प्रवास करताना वाहनांच्या आवश्यक असलेल्या तपासणी करण्याची सुविधा ऐच्छिक स्वरुपात नागरिकांना उपलब्ध करुन द्यावी. खासगी तसेच एसटी बसच्या आपत्कालीन दरवाज्यांची प्रवाश्यांना नियमतिपणे माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. रस्त्यावर ठराविक अतंराने प्रवाश्यांसाठी प्रसाधन गृहांची उपलब्धता ही अत्यावश्यक सुविधा आहे. त्यादृष्टीने प्रसाधन गृहांच्या संख्येत वाढ करण्यात यावी.तसेच सद्य:स्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या असलेल्या प्रसाधन गृहांची माहिती राज्यरस्ते महामंडळाने गुगल मॅपवर प्रवाश्यांच्या सोयीच्या दृष्टीने उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिले.

यावेळी सर्व उपस्थित यंत्रणा प्रमुखांनी आपल्या विभागामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून
Spread the love

One Comment on “रस्ते सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *