Avail transport services from home Aadhaar base faceless facility for transport department services
घरबसल्या मिळवा परिवहन सेवांचा लाभ परिवहन विभागाच्या सेवांसाठी आधारबेस फेसलेस सुविधा
ऑनलाईन पद्धतीने फेसलेस सेवेमार्फत अर्ज केल्यास, आहे त्या ठिकाणाहून किंवा घरबसल्या कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज सादर करून या सुविधेचा लाभ घेता येणार
मुंबई : परिवहन विभागाच्या सेवा आता कार्यालयात न जाता फेसलेस सुविधेचा उपयोग करून मिळविता येणार आहे. फेसलेस सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयाची पायरी चढण्याची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीने फेसलेस सेवेमार्फत अर्ज केल्यास, आहे त्या ठिकाणाहून किंवा घरबसल्या कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज सादर करून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
यापूर्वी शिकावू परवाना (लायसन्स) काढण्यापासून ते नूतनीकरण, परवान्याची दुय्यम प्रत मिळविणे, नावात बदल, पत्ता बदल, लायसन्समधील वर्ग रद्द करणे व परवाना क्रमांकाची माहिती प्राप्त करणे आदी कामकाजासाठी नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सुट्टी घेऊन जावे लागायचे. तसेच कार्यालयातही मॅन्युअल पद्धतीने कामे सुरू असल्यामुळे नागरिकांना रांगेत उभे राहून वेळ लागायचा. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व वेळ वाया जावू नये, या उद्देशाने परिवहन विभागात ही फेसलेस सुविधा सुरू केली आहे.
दुचाकी, चारचाकी वाहन संदर्भातील दुय्यम प्रमाणपत्र काढणे, वाहन हस्तांतरण, वाहनावरील कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, पत्त्यात बदल करणे, नावात बदल करणे, ना- हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनाची माहिती मिळविणे आदी कामकाजासाठी नागरिक कार्यालयात येतात. या फेसलेस सेवांमुळे आता नागरिकांना कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयात येण्याची गरज नाही. तसेच वाहनांच्या कामकाजाबाबत वाहनांची सर्व माहिती ऑनलाईन असल्यामुळे त्यांना त्यांचे वाहनही कार्यालयात आणण्याची आवश्यकता नाही.
परिवहन विभागातील फेसलेस केलेली सेवा ही आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात आली आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी आपल्या आधार क्रमांकाची मोबाईल क्रमांकाशी संलग्नता असणे आवश्यक आहे. नमूद सेवांचा लाभ कसा घ्यावा, यासंदर्भात तपशीलवार माहिती transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्राप्त होऊ शकते. सर्व लायसन्स, दुचाकी व चारचाकी या खासगी वाहनासंबधी सर्व सेवा आधार क्रमांकावर आधारीत पद्धतीने फेसलेस प्रणालीद्वारे सुरू झाल्या आहेत. फेसलेस सेवांसाठी परिवहन विभागाचे संकेतस्थळ https://parivahan.gov.in वर संपर्क करून नागरिकांनी जास्तीत जास्त सेवांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 022-24036221 व ई-मेल आयडी rto.03-mh@gov.in या वर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई (पूर्व) चे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “घरबसल्या मिळवा परिवहन सेवांचा लाभ; आधारबेस फेसलेस सुविधा”