Directed to complete the flyover and road work at the earliest
उड्डाणपुलाचे आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे दिले निर्देश
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली चांदणी चौक येथील परिसरातील रस्त्याच्या कामांची पाहणी
पुणे : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी एनडीए चौकात (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत असलेल्या उड्डाणपूल आणि रस्त्याच्या कामांची पाहणी केली. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे आणि रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, प्रकल्प व्यवस्थापक श्रीनिवास, प्रकल्प समन्वयक किशोर भरेकर, एनएचएआय सल्लागार अभियंता भारत तोडकरी, सुरक्षा अधिकारी कुंदन कुणाल आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत चांदणी चौकातील कामाची पाहणी करून नवीन व्हीओपीच्या सद्यस्थितीतील कामाबद्दल व चौकातील इतर कामाबद्दल आढावा घेतला.
श्री. देशमुख म्हणाले, चांदणी चौक हा पुण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे. या ठिकाणाहून पाच वेगवेगळे मार्ग जातात. गेल्या वर्षभरात प्रकल्पाचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील मुख्य अडचणी म्हणजे रखडलेले भूसंपादन, सेवा वाहिन्यांचे स्थलांतर, न्यायालयीन प्रकरणे व स्थानिक अतिक्रमणे आदी अडचणी गतीने कार्यवाही करत दूर करण्यात आल्या आहेत. गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. पुढील महिन्यात उड्डाणपूलाचे लोकार्पण करण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने कामे पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
व्हीओपी कामांतर्गत स्तंभाच्या तुळईचे (बिम ऑफ कॉलम) चे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावरील एकूण ३२ गर्डरपैकी (गर्डर लांबी २२ ते ३५ मी) २५ गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. मुख्य रस्त्यावरचे ९ पैकी ५ गर्डरचे (गर्डरची लांबी ५७.५ मी) काम पूर्ण झाले असून उर्वरीत काम प्रगतीपथावर आहे. सेवा रस्त्याच्या ४ स्पॅनचे स्लॅब पूर्ण झाले आहे. मुख्य रस्त्यावरील स्लॅब बांधणीचे काम सुरू असून इतर तत्सम कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
चांदणी चौक प्रकल्पाचे एकूण ९५ टक्के काम पूर्ण झाले असून जुलै, ऑगस्ट २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक श्री. कदम यांनी दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “उड्डाणपुलाचे आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश”