Swachhata Monitors’ initiative will be implemented on a large scale
‘स्वच्छता मॉनिटर्स’ उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती आवश्यक
समाजातील निष्काळजीपणा दूर करणे हा स्वच्छता मॉनिटर्स उपक्रमाचा उद्देश
मुंबई : विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनविणाऱ्या ‘लेटस् चेंज’ उपक्रमात मागील वर्षी विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला होता. याचे सकारात्मक परिणाम लक्षात घेता हा उपक्रम यावर्षी अधिक व्यापक प्रमाणावर राबविण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
मागील वर्षी 2 ऑक्टोबर ते 24 डिसेंबर 2022 या कालावधीत लेटस् चेंज प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर्स जबाबदारी स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. यास विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविण्याबाबत मंत्री श्री.केसरकर यांनी आज आढावा घेतला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी, उपसचिव समीर सावंत, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, कक्ष अधिकारी मृणालिनी काटेंगे, लेटस् चेंज प्रकल्पाचे रोहित आर्या आदी उपस्थित होते. तर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी तसेच विभागीय आणि जिल्हा पातळीवरील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
मंत्री श्री.केसरकर म्हणाले, आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. समाजातील निष्काळजीपणा दूर करणे हा स्वच्छता मॉनिटर्स उपक्रमाचा उद्देश असून विद्यार्थ्यांनी समजावून सांगितले तर त्याचा सकारात्मक परिणाम होत असल्याचा अनुभव आहे.
मागील वर्षी या उपक्रमात 12 हजारांहून अधिक शाळा सहभागी झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्यातील सर्वच शाळांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 22 जुलै 2023 पर्यंत नोंदणी करावी, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांनी देखील यात सहभागी होऊन सर्वांनी एकत्रितपणे अभियान म्हणून हा उपक्रम राबवावा, असे आवाहन त्यांनी केले. तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार असल्याने त्यांच्या अभ्यासावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी शिक्षणाधिकारी तसेच मुख्याध्यापकांना केल्या.
या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांमार्फत नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आणि मुख्यत: कचरा न होऊ देण्याचे काम करणे अपेक्षित आहे. यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावयाचे असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या केलेल्या कामाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट करावयाचे आहेत. या अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 ऑक्टोबर 2023 रोजी गौरविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “‘स्वच्छता मॉनिटर्स’ उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविणार”