Minister Girish Mahajan will provide up-to-date healthcare services in government hospitals
शासकीय रुग्णालयांत अद्ययावत आरोग्यसेवा उपलब्ध करणार – मंत्री गिरीष महाजन
मुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यांत अद्ययावत आरोग्यसेवा पुरविण्यात येणार असून रक्त शुद्धीकरणाबरोबरच मोठ्या शस्त्रक्रिया करण्याची सुविधा सर्व शासकीय रुग्णालयांत पुरविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
सेंट जॉर्जेस रुग्णालय, ग्रॅण्ड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालये, मुंबई संचलित श्रेणीवर्धित शस्त्रक्रियागृहाचे लोकार्पण व रक्त शुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन सेंट जॉर्जेस रुग्णालय येथे मंत्री श्री. महाजन आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मंत्री श्री. महाजन बोलत होते.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर , वैद्यकीय शिक्षण व संशोधन सहसंचालक अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याकरिता आवश्यक रक्त शुध्दीकरण केंद्र (मेंन्टेनस हिमोडायलिसिस) सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देणे आवश्यक होते. खासगी रुग्णालयांतील उपचार गरीब रुग्णांना परवडणारे नसल्याने ही सुविधा शासकीय रुग्णालयांत उपलब्ध करुन दिली आहे.
सेंट जॉर्जेस रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या केंद्रात शासकीय नियमित रक्त शुध्दीकरण 10 यंत्रे असणार आहेत. ही सुविधा 3 सत्रांत सुरु राहील. या केंद्रातून दिवसभरात 30 रुग्णांवर उपचार होतील. एका रुग्णाच्या डायलिसिसकरिता साधारणत: 4 तास लागतात त्यामुळे एका सत्रात 10 यंत्रांच्या माध्यमातून 10 रुग्णांवर डायलिसिस व दिवसात 30 रुग्णांवर डायलिसिस करण्यात येईल. मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णास आठवड्यातून 03 डायलिसिस आवश्यक असल्याने तेच रुग्ण पुन्हा चौथ्या दिवशी डायलिसिस करीता येतील. याव्यतिरिक्त आणखी दोन यंत्राद्वारे तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार HIV & HBSAG पॉझिटिव्ह रुग्णांसाठी देखील रक्त शुध्दीकरण केंद्रामध्ये सेवा देण्यात येईल. हिमोडायलिसिस केंद्रामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळतील. या योजनेमध्ये समावेश नसलेल्या रुग्णांवर शासकीय दरानुसार रुपये 225 एवढ्या माफक दरात डायलिसिस करण्यात येईल.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, रक्त शुद्धीकरण म्हणजे कायमस्वरूपी उपचार नसून किडनी प्रत्यारोपण करणे गरजेचे आहे. किडनी प्रत्यारोपण प्रतिक्षा यादी मोठी आहे. त्यामुळे अवयव दानाची आवश्यकता असून अवयव दानाची चळवळ उभी राहणे आवश्यक आहे.
सेंट जॉर्जेस रुग्णालयात वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाचे अत्याधुनिकीकरण करुन त्याचेही लोकार्पण करण्यात येत असल्याचे सांगून सुसज्ज असे शस्त्रक्रियागृह तयार करण्यात आले आहे. यामध्ये 6 शस्त्रक्रियागृह असून त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना लाभ होणार असल्याचे मंत्री श्री. महाजन म्हणाले. शस्त्रक्रिया विभागावरचा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल, असेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, सेंट जॉर्जेस या रुग्णालयाच्या परिसरात रुग्णांची संख्या मोठी आहे. शासनाने येथे श्रेणीवर्धित शस्त्रक्रियागृह व रक्त शुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करुन परिसरातील रुग्णांना चांगली रुग्ण सेवा उपलब्ध करून दिली आहे. पायाभूत सुविधांबरोबरच मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना त्यांनी केली. डॉ. सापळे यांनी प्रास्ताविक केले तर आभार श्री. निवतकर यांनी मानले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “शासकीय रुग्णालयांत अद्ययावत आरोग्यसेवा उपलब्ध करणार”