Ambitious Chandrayaan-3 launched into space
महत्त्वाकांक्षी चांद्रयान-तीन अंतराळात झेपावलं
भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
श्रीहरीकोटा : भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-तीनचं प्रक्षेपण आज झालं. यासाठीची उलट गणती काल दुपारी १ वाजून ५ मिनिटांपासून सुरू झाली. आज दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून एल व्ही एम 3 या अग्निबाणाच्या सहाय्यानं चांद्रयान तीन अंतराळात झेपावलं आणि त्याचा चंद्राकडे प्रवास सुरु झाला.
यामध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलचा समावेश आहे. २०१९ च्या चांद्रयान-दोन मोहिमेत सॉफ्टवेअर बिघाडामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर कोसळलं होतं. त्यामुळे आताच्या लँडरमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. लँडर चंद्रावर अलगद उतरून तिथलं तापमान, तसंच भोवतालची कंपनं मोजून प्लाझ्मा घनतेचा अंदाज लावणार आहे; तर रोव्हर परिसरातल्या मूलभूत रचनेबाबत माहिती गोळा करणार आहे.
चांद्रयान-३ ही भारताची महत्वाकांक्षी चांद्र मोहीम देशाच्या आशा आणि स्वप्न पूर्ण करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या कामगिरीमध्ये १४ जुलै २०२३ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘चांद्रयान-३’च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी वैज्ञानिकांचे अभिनंदन
मुंबई : चांद्रयान-3 मोहीम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘चांद्रयान-3 ही मोहीम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचे प्रतीक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रातदेखील भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चांद्रयान मोहीम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्त्वपूर्ण अशी आहे. यातून पुढे अनेक वैज्ञानिक, संशोधन प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्वास आहे. या मोहिमेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारत सरकारने आपल्या वैज्ञानिकांना सातत्यपूर्ण असे पाठबळ आणि प्रोत्साहन दिले आहे. आपल्या तरूण वैज्ञानिकांसाठी हा क्षण प्रेरणादायी आहे. भारतीयांच्या, अवकाशातील या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “महत्त्वाकांक्षी चांद्रयान-तीन अंतराळात झेपावलं”