Everyone needs to strive for India’s ‘Self’
भारताच्या ‘स्व’साठी सर्वांनी झटण्याची गरज – राज्यपाल राजेंद्र आर्लेकर
सोन्याची चिमणी नव्हे तर सोन्याची सिंहगर्जना संपूर्ण जग ऐकेल असे आपले काम असायला हवे.
पुणे: भारताच्या अमृतकाळात स्वदेश, स्वविचार, स्वआचार याचे आपण सर्वांनी जागरण केल्यास आपल्याला आता कोणीही रोखू शकणार नाही असा विश्वास बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आज येथे व्यक्त केला. पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष, अर्थतज्ञ व इतिहास संशोधक डॉ. विवेक देबरॉय यांना आज भांडारकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया, उपाध्यक्ष प्रदीप आपटे, कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, विश्वस्त प्रदीप रावत, मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन उपस्थित होते.
राज्यपाल आर्लेकर पुढे म्हणाले की, भारताची संस्कृती, परंपरा खूप प्राचीन आहे. देशाच्या स्वत्वाची भावना समजून घेत आपण आज प्रगती करीत आहोत. आपल्या महान ग्रंथांमधून आपण सार घेतले पाहिजे. सोन्याची चिमणी नव्हे तर सोन्याची सिंहगर्जना संपूर्ण जग ऐकेल असे आपले काम असायला हवे.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. विवेक देबरॉय म्हणाले की, भांडारकर संस्थेने दिलेला हा बहुमान अत्यंत मोठा आहे. भांडारकर संस्थेमुळे माझे संपूर्ण जीवन बदलून गेले आहे. या संस्थेत मी केलेल्या अल्पशा कामाची ही पोचपावती आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध संशोधनात्मक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकांचे लेखक व संशोधक डॉ. अनुराधा कुलकर्णी, डॉ. वासुदेव डोंगरे, डॉ. उमा वैद्य, डॉ. मंजुषा गोखले व प्रमोद जोगळेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सर्वांचे स्वागत आपटे यांनी केले तर अभय फिरोदिया यांनी या पुरस्कारामागची भूमिका विषद केली. विश्वस्त प्रदीप रावत यांनी आभार मानले तर डॉ. श्रीनंद बापट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com