A meeting was held regarding the special brief revision program in Bhor Assembly Constituency
भोर विधानसभा मतदार संघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाब बैठक संपन्न
पुणे : भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला. या पार्श्वभूमीवर 203 भोर विधानसभा मतदार संघातील भोर-वेल्हा-मुळशी तालुक्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक उपविभागीय अधिकारी भोर यांच्या कार्यालयात संपन्न झाली.
यावेळी भोर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार सचिन पाटील, निवडणूक नायब तहसिलदार अजिनाथ गाजरे, हरिदास चाटे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे तालुका स्तरीय प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. कचरे म्हणाले, मतदार संघातील प्रत्येक मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर 1 मतदान केंद्रस्तरीय सहायकाची नेमणूक 21 जुलै 2023 पूर्वी करावी. अर्हता दिनांकाबाबत झालेल्या सुधारणेनुसार 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या दिनांकास 18 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदणी करता येणार आहे.
या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत. पडताळणीमुळे मतदार यादीचे शुद्धीकरण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय सहायकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहाय्य करावे, असे आवाहन श्री. कचरे यांनी केले.
मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणीचा कालावधी शुक्रवार 21 जुलै ते सोमवार 21 ऑगस्ट 2023, एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी करणे मंगळवार 17 ऑक्टोबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी मंगळवार 17 ऑक्टोबर ते गुरुवार 30 नोव्हेबर, विशेष मोहिमेचा कालावधी- दावे व हरकती स्वीकरण्याचा कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार, दावे व हरकती निकालात काढणे मंगळवार 26 डिसेंबर 2023, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणी आणि डाटाबेस अद्यावत करणे व पुरवणी याद्यांची छपाई सोमवार 1 जानेवारी 2024 पर्यंत, मतदार यादी अंतिम प्रसिद्धी करणे शुक्रवार, 5 जानेवारी 2024 अशा प्रकारे मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आहे, अशी माहिती श्री. कचरे यांनी यावेळी दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com